सौ. हनिशा दुधे तालुका प्रतिनिधी बल्लारपूर
बल्लारपूर:- एकीकडे संपूर्ण देश आजादीचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करत होता तर दुसरीकडे जातीयता, धर्मांधतेने ग्रासलेल्या व्यवस्थेमुळे एका निष्पाप कोवळ्या विद्यार्थ्यांचा एका नराधम शिक्षकाने बळी घेतला. या नराधम शिक्षकाला भररस्त्यात फाशी देण्याची मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली.
भारतासारख्या लोकशाही प्रधान देशात स्वातंत्र्याचे ७५ वर्षे पूर्ण होऊनही अजूनही जातिव्यवस्थेची कीड मनुवादी विचारसरणीच्या लोकांच्या मनातून गेलेली नाही हे राजस्थानच्या जालौर येथील घटनेवरून दिसून येते. पिण्याच्या माठातून पाणी पिण्याच्या कारणावरून एका दलित विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम व अमानुष मारहाण केली त्यामुळे त्या मारहाणीत दलित विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून याला जबाबदार सध्याची राजकीय व्यवस्था, जातीयवादी मानसिकता व तेथील संबंधित प्रशासन आहे. संबंधित शिक्षण संस्थेत दलितांना पिण्याचे पाणी वेगळे व सवर्णांना पिण्याचे पाणी वेगळे अशी व्यवस्था करून ठेवली होती. तरीसुद्धा तेथील अधिकारी, जिल्हाधिकारी, संबंधित शिक्षण संस्थेचे पदाधिकारी हे सुद्धा तितकेच दोषी आहेत त्यांच्यावर सुद्धा तात्काळ गुन्हा दाखल करावा व कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या देशात एससी, एसटी, ओबीसी वर होणारे अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत असून याला जबाबदार काँग्रेस बीजेपी सरकार आहे. या दोन्ही पक्षाने या देशात जातीय व्यवस्था बळकट करण्यासाठी व या व्यवस्थेतून सत्तेची मलाई खाण्याचे काम केले आहे. काँग्रेस बीजेपीच्या धोरणामुळेच या देशाचा सत्यानाश होत असून देशात कुठे ना कुठे असे प्रकरण घडून दलित, आदिवासीं, ओबीसीवरचे अत्याचार वाढत आहेत.अत्याचार करणाऱ्याला वेळीच आवर घालण्यासाठी त्यानंतर शिक्षकाला भर रस्त्यात फाशी द्यावी व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे यांनी केली. निवेदन देताना राजू झोडे, संपत कोरडे, प्रदिप झामरे,अनीरूप पाटील, स्नेहल साखरे, भूषण पेटकर, भगतसिंग झगडा, सचिन पावडे ,जाकिर खान,नविन डेविड तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.