बरखा दत्त यांच्या लेखाचा मराठी अनुवाद
जमावाने केलेला अमानुष सामूहिक बलात्कार सोसावा लागला तिला. डोळ्यासमोर कुटुंबियांची हत्या झालेली पहावी लागली. त्यानंतर तब्बल सतरा वर्षे ती न्यायासाठी झुंजत राहिली. आणि आता शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच त्या अकराच्या अकरा बलात्कारी गुन्हेगारांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आलीय. बिल्कीशच्याच शब्दात सांगायचे तर एखाद्या स्त्रीच्या न्यायासाठीच्या लढ्याचा शेवट केवळ असाच होऊ शकतो काय?
एक बाई म्हणून मी हे दुसऱ्या बाईला सांगतेय. तुम्ही सर्वांनी ऐकावं म्हणून मी हे सांगतेय.
कल्पना तरी करवते तुम्हाला? तुम्ही पाच महिन्याच्या गरोदर असताना पुरुषांची झुंड एकेक करून झेप घेतेय तुमच्यावर. आळीपाळीने बलात्कार करते आहे. आणि मग कल्पना करा. हेच लोक तुमच्या आईवरही असाच बलात्कार करतात. ते पाहणं तुम्हाला भाग पडतंय. थोड्या वेळापूर्वी तिलाही तुमच्यावरचा बलात्कार असाच पहावा लागलेला होता. मग तुमच्या दोन्ही बहिणींची पाळी येते. आणि हे जणू पुरेसे भीषण नाही म्हणून की काय कल्पना करा तुम्ही काळ्यानिळ्या पडलेल्या अंगानिशी रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडलेल्या आहात. बलात्काऱ्यांनी तुमचा हात पिरगाळून मोडलाय. अशा अवस्थेत तुमच्या डोळ्यादेखत ते तुमच्या तीन वर्षाच्या मुलीच्या डोक्यात दगड घालून तिला ठार करतात.
या कल्पनेतील अधिकच वाईट गोष्ट ही की हे पुरुष कुणी अनोळखी नसतात. त्यांना तुम्ही नीट ओळखत असता. तुमच्या शेजारीच राहतात ते. रोजच्या रोज तुमच्या घरातूनच ते दूध विकत घेत असतात. आजवर तुम्ही त्यांना आपली माणसे समजत असता.
आणि मग अशी कल्पना करा की आयुष्याची सतरा वर्षे भारतातल्या या न्यायालयातून त्या न्यायालयात तुम्ही न्याय मिळावा म्हणून संघर्ष करता. दरम्यान वीस वेळा तुम्हाला घर बदलावं लागतं. कधी सुरुवातीलाच तुमचा खटला तुमच्या स्वतःच्या राज्यातून दुसऱ्या राज्यात हलवण्यात आला म्हणून. तर कधी तुमच्या जिवाची तुम्हाला भीती वाटली म्हणून. आणि मग बऱ्याच कालखंडांनंतर जखमेवरची खपली वाळून आता स्थिती पूर्ववत होते आहे आणि पुन्हा व्यवस्थित जगू लागण्याचे बळ तुमच्या अंगी येते आहे असे तुम्हाला वाटू लागते न लागते तोच हे अकरा गुन्हेगार राज्यसरकारच्या एका प्रशासकीय आदेशान्वये तुरुंगातून मुक्त केले जातात.
एकाच स्वरूपाचे काम पुन्हा पुन्हा करून निबर झालेल्या व्यक्तीच्याही मनाला काही कहाण्या अगदी आपल्याच वाटतात. बिल्कीशची कहाणी मला अशी खास माझी वाटते. जिवाला लागलेली.
एका काळोख्या रात्री गोध्रा येथील मदत शिबिरात मी तिला प्रथम भेटले होते. ताडपत्रीच्या तंबूत अंगाचे मुटकुळे करून इतर अनेक स्त्रियांसह ती दाटीवाटीने बसली होती. जवळ रॉकेलचा दिवा मिणमिणत होता. वीस वर्षे झाली त्याला. पण या आठवड्यातले ते सगळे मथळे वाचताना ते जणू कालच घडल्यासारखं वाटतंय.
त्या रात्री तिच्या वाट्याला काय काय आलं हे मला सांगत असताना ती रडली नव्हती. शून्य नजरेने ती आपला आघात पेलत होती. कोणताच भाव नव्हता तिच्या डोळ्यात. जणू खोलवर आत काहीतरी मरून गेलं होतं.
आता तिचा नवरा मला म्हणाला की तिच्यावर बलात्कार करून तिचे मूल मारून टाकणाऱ्यांची परवा सुटका झाल्यापासून, त्यांच्या गळ्यात हार घातले जाऊन त्यांना मिठाई भरवली गेली तेव्हापासून बिल्कीश पुन्हा तशीच थिजून गेलीय. शब्द फुटणे कठीण झालंय. एकटं एकटं वाटू लागलंय तिला. भय दाटून आलंय.
तुम्हाला वाटेल बिल्कीशच्या या ठसठसत्या जखमेवर आणखी मीठ चोळून ती अधिक झोंबरी करताच येणार नाही कुणाला. मग मात्र तुम्हाला पुनर्विचार करणे भाग आहे.
सी. के. राउलजी नावाचे भारतीय जनता पक्षाचे एक आमदार आहेत. या गुन्हेगारांची सुटका करण्याची शिफारस करणाऱ्या गुजरात सरकारच्या समितीचे ते एक सदस्य होते. मोजो स्टोरी या मी चालवत असलेल्या व्यासपीठाशी बोलताना ते म्हणाले, “ हे लोक ब्राह्मण आहेत. ब्राह्मणांचे संस्कार चांगले असतात. तुरुंगातील त्यांची वर्तणूक उत्तम होती.” ही दृश्य मुलाखत सर्वदूर पसरताच अगदी पक्षाचे समर्थक आणि पाठिराखेही कानकोंडे झाले.“संस्कारी” बलात्काऱ्यांबद्दलच्या या आमच्या मुलाखतीने एक गोष्ट निःसंशयरीत्या स्पष्ट झाली. कैदी माफी योजनेचा एक भाग म्हणून या माणसांची 14 वर्षांनंतर मुक्तता करण्याच्या निर्णयामागचा हेतू सुधारात्मक बिधारात्मक मुळीच नव्हता. या राउलजींनी एक पाऊल पुढे जाऊन त्यांच्या गुन्ह्याबाबतच शंका उपस्थित केली. म्हणाले, “ त्यांनी गुन्हा केला की केलाच नाही याची मला काही कल्पना नाही.”
आपण काही केले तरी कोणी आपले काहीही वाकडे करू शकणार नाही अशा निलाजऱ्या गुर्मीत घोर अन्याय केला जात आहे. त्याचा कायदेशीरपणा चकवेबाज आहे. याच वर्षी काही महिन्यांपूर्वी केंद्रीय गृहखात्याने घोषित केलेल्या मार्गदर्शक सूचनांत असे स्पष्ट म्हटलेले आहे की कैद्यांची मुदतपूर्व सुटका करण्याच्या उपक्रमातून बलात्काराबद्दल शिक्षा झालेल्यांना वगळले पाहिजे. परंतु गुजरात सरकारने1992 च्या जुन्या कायद्याप्रमाणे कृती केली असेल तर या सरकारने केंद्र सरकारातील कुणाकडून तरी त्याला मान्यता घेणे बंधनकारक होते असे कायदेपंडितांचे मत आहे. संबंधित निर्णयाला कुणी आणि कुठल्या पातळीवर मान्यता दिली याबद्दल कोणतीही पारदर्शक स्पष्टता मुळीच दिसून येत नाही. सगळे अळी मिळी गुपचिळी.
बिल्कीश बानोच्या वकील शोभा गुप्ता यांनी पीडितेला न्याय मिळावा म्हणून तिच्या बरोबरीने वर्षानुवर्षे संघर्ष केला आहे. त्या मला म्हणाल्या की त्यांना मोडून पडल्यासारखं झालंय आणि बिल्कीशसमोर उभे रहायचेही बळ उरलेले नाही. आणि तरी मी त्यांना बिल्कीश गुजरात सरकारच्या या निर्णयाविरुद्ध न्यायालयात अपील करणार का असं विचारलंच तेव्हा त्यांनी दिलेले उत्तर ऐकून शरमेने माझी मान खाली गेली. “एका व्यक्तीने करून करून किती धैर्य गोळा करावं? आता हा लढा कुणीतरी दुसऱ्यानं पुढं नेला पाहिजे. सी बी आय नं या निर्णयाविरुद्ध अपील दाखल करावं, केंद्र सरकारने करावं. पंतप्रधानांनी यात भाग घ्यावा.” त्या म्हणाल्या.
आपण दुसरीकडे नजर फिरवू शकतो. हा काही आपला प्रश्न नाही असा अविर्भाव आणू शकतो.
पण एक बाई म्हणून दुसऱ्या बाईशी बोलायचं तर म्हणेन, “ तुम्ही जाणता, हा आपला आपलाच प्रश्न आहे.”
शोभा गुप्तांनी दुसरी एक गोष्ट मला सांगितली. हे सगळ्या दोषी तुरुंगातून बाहेर येऊन मुक्त फिरू लागले तेव्हा लैंगिक अत्याचार झालेल्या दुसऱ्या एका स्त्रीने त्यांना फोन केला. अतिशय निराश स्वरात तिने त्यांना विचारले,
”मी माझा खटला मागे घेऊ का?”
16 डिसेंबर 2012 च्या प्रसंगी आपण सर्वांनी पाहिला तो उद्रेक आज कुठे गेला?
या साऱ्या गुन्हेगारांचे उरलेले आयुष्य कोर्टाच्या शिक्षेप्रमाणे तुरुंगात व्यतीत होणे हेच योग्य नाही का?
आणि बिल्कीश म्हणाली त्याप्रमाणे कोणत्याही बाईच्या न्यायासाठीच्या लढाईचा शेवट केवळ असाच होऊ शकतो का?
आपण केव्हढा मोठा आवाज उठवणार यावर या प्रश्नाचे उत्तर अवलंबून आहे.
चला, आसमंत दणाणून सोडू या.
भेदून टाकू सगळी गगने
दीर्घ आपल्या आरोळीने!
मूळ लेखन : बरखा दत्त
अनुवाद: अनंत घोटगाळकर
उषाताई कांबळे सांगली प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- येथील एका उद्योजक कुटुंबावर बेंगळुरु…
सिरोंचा, 22 डिसेंबर: पंचायत समिती सिरोंचा अंतर्गत आयोजित तीन दिवसीय तालुकास्तरीय बालक्रीडा व सांस्कृतिक संमेलनात…
*मानवधिकारी तालुकाध्यक्ष निवृत्त नायब तहसीलदार फारुख शेख तर सचिवपदी साईनाथ औऊतकर यांची निवळ* मधुकर गोंगले,…
आसमा सय्यद पुणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यातून एक खळबळजनक घटना…
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी या नोकर भरतीचा मुद्दा विधानसभेत मांडला. सौ. हनिशा दुधे, चंद्रपूर…
श्याम भुतडा बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- जिल्हात नेमके चाललं तरी…