लेखक: संजय मेश्राम, पुणे
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विशेष लेख:- आपल्या खणखणीत आवाजाच्या जादूने मोहिनी घालणाऱ्या किरण पाटणकर गेल्या. आंबेडकरी चळवळीसाठी हा धक्का आहे. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. काही वर्षांपासून गाणंही बंद होतं, तरीही बातमी ऐकून विश्वास ठेवायला मन तयार होतं नव्हतं. आपलं मन जे स्वीकारतच नाही, त्यावर सहज विश्वास ठेवतच नाही.
१९९७ च्या डिसेंबरमध्ये बेझनबाग येथील त्यांच्या घरी भेट झाली होती. तीच पहिली भेट, तीच शेवटची भेट. ओसरीत बसून छान गप्पा झाल्या होत्या. त्यांनी विचारलं म्हणून मी मूळचा भंडारा जिल्ह्यातील आहे, असं सांगितलं. त्यांनी तिकडल्या अनेक छोट्या- छोट्या गावांची नावं सांगितली. त्यांचे काही नातेवाईकही तिकडे राहतात, ही माहितीही पुरवली. या भेटीत त्यांनी त्यांचं एक छायाचित्रही दिलं होतं. ते आजही तसंच आहे, सुरक्षित.
किरण पाटणकर महाराष्ट्रभर दौरे करीत. विशेषतः विदर्भातील एक एक गाव त्यांना ठाऊक होतं. शंकरपट, मंडई, भीमजयंती अशा कार्यक्रमांसाठी किरण आणि प्रकाश पाटणकर या भावा- बहिणींना विदर्भात कायम बोलवले जायचे. यांच्या तारखा पूर्ण बूक असत. वडील नागोराव पाटणकर यांचा संपन्न वारसा त्यांनी तेवढ्याच ताकदीने चालवला. आंबेडकरी समाजातील घराघरांत त्यांच्याच कॅसेट, सीडी वाजत असत. या गाण्यांमुळे गावातील वातावरण भारलेलं असायचं.
गायनाची आवड त्यांना बालपणापासूनच होती. अर्थात वडिलांमुळेच त्यांना ही गोडी लागली. शाळेत किंवा घरगुती कार्यक्रमात त्या लाजत मुरडत गात असत. वयाच्या बाराव्या वर्षी त्या पहिल्यांदा स्टेजवर गायल्या. समोर तोबा गर्दी. त्या थोड्या घाबरल्या. पण स्वतःला सावरलं, हिमतीनं गायल्या. तेव्हा लोकांनी त्यांना डोक्यावर घेतलं. वडिलांचं मार्गदर्शन मिळत गेलं आणि त्या स्वतःला घडवू लागल्या. पुढं उर्दू उच्चारण योग्य असावं यासाठी त्यांनी फैज नागपुरी यांच्याकडून धडे घेतले. कव्वालीच नव्हे तर गझल, गीते, भीम-बुद्ध गीते, भोजपुरी, पंजाबी गाणी त्यांनी गायली. एवढंच काय, पॉप गाणीसुद्धा गायली. अशी ही हरहुन्नरी गायिका. शास्त्रीय संगीतात आपण कमी पडू नये, तेही अंग असावं म्हणून त्यांनी सूरमणी पं. प्रभाकर धाकडे यांच्याकडून त्यांनी धडे घेतले. दक्षिणेतील राज्यांसह गोवा, दिल्ली आणि भारत-पाक सीमा आदी ठिकाणी त्यांनी उर्समध्ये कार्यक्रम सादर केले. त्यांना खूप दाद मिळायची.
किरण पाटणकर यांनी प्रल्हाद शिंदे, मजिद शोला यांच्यासोबत गाणी गायली, कव्वाली गायली. त्या म्हणायच्या, मनोरंजनासह समाज प्रबोधनासाठी कव्वाली हे उत्तम माध्यम आहे. लोकांना उपदेश नको असतात. त्यांना भाषणबाजी नको असते. लोक कंटाळतात. हेच लोकं कव्वालीचा आनंद घेतात. दाद देतात. आकाशवाणी, दूरचित्रवाणी ही माध्यमे कव्वाली हा प्रकार टिकवण्यासाठी, त्याला प्रोत्साहन देण्यासाठी मोलाची भूमिका पार पाडू शकतात, पण तसे होताना दिसत नाही, याची त्यांना खंत वाटायची. कव्वाली कलावंतांची या माध्यमांमध्ये फारशी दखलच घेतली जात नाही, अशी त्यांची तक्रार होती. आणि ती खरीच आहे.
तुम तो ठहरे परदेसी, साथ क्या निभाओगे.. हे प्रसिद्ध शायर जहीर आलम यांनी लिहिलेलं गाणं १९९७-९८ च्या काळात अल्ताफ राजाच्या आवाजात खूप गाजलं. कॅसेट विक्रीचे रेकॉर्ड केले. गिनीज बूक मध्ये दखल घेण्यात आली.
याच्या आधीची कथा ठाऊक आहे?
किरण पाटणकर जेव्हा नव्या नव्या या क्षेत्रात आल्या होत्या, तेव्हा त्यांना उत्तम काव्यासाठी एखाद्या चांगल्या शायराची आवश्यकता होती. कतील उस्मानी नावाचे एक शायर होते. त्यांनी जहीर आलम यांना ही गोष्ट सांगितली. त्यांनीच मग किरण पाटणकर यांच्याशी जहीर आलम यांची भेट घडवून दिली. जहीर आलम यांनी काही ओळी लिहून दाखवल्या. किरण पाटणकर यांनी त्या गुणगुणत वाचल्या. त्यांना त्या फारच आवडल्या. पुढे जहीर आलम यांनी त्यांच्यासाठी कितीतरी कव्वाल्या लिहून दिल्या. श्रोत्यांची दाद मिळत गेली. १९८१ साली जहीर आलम हे किरण पाटणकर यांच्या घरी बसले होते. त्या म्हणाल्या, एखादी नवी कव्वाली हवी. जहीर आलम यांनी तिथल्या तिथं बसून कागद पेन हातात घेतला अन लिहायला लागले, तुम तो ठहरे परदेसी… साथ क्या निभाओगे… पुढं ही कव्वाली किरण पाटणकर किती तरी कार्यक्रमांत गात असत. किरण पाटणकर गेल्या, ही बातमी जहीर आलम यांना कळवावी म्हणून त्यांना फोन केला. मी काही सांगायच्या आधीच त्यांनीच मला ही खबर दिली. ते म्हणाले, बहुत दुख हुआ. जबरदस्त आर्टिस्ट थी वह. मैं जा नहीं पाया भैया!
तब्बल चाळीस वर्षे दोघांची ओळख होती. आजारा विषयी कळलं म्हणून आठ महिन्यांपूर्वी जहीर आलम त्यांना भेटायला गेले होते. खूप आजारी होत्या त्या. ही आखरी मुलाकात याद करताना जहीर आलम म्हणाले, बोल तो नहीं पाई वह, मगर आंखों से आंसू निकल पड़े!
खामोश मुलाकात! एक एक सहकारी हात सोडवून निघून जात आहेत, याचं जहीर आलम यांना दुःख आहे. स्वतःची समजूत घालताना लिहिलेला शेर त्यांनी ऐकवला-
खाक तो छान चुके, सारे जहां की ‘आलम’
अब हमेशा जहाँ रहना है वहीं घर देखो…
राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २० मतदान करण्यात आले आहे मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा…
प्रवीण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील आर्वी विधानसभा मतदार…
अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरातील डॉ. आंबेडकर चौक…
*राजाराम मतदान केंद्रावर मतदानाचा टक्केवारी ८५. २०मतदान करण्यात आले आहे* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी.…
राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- विधानसभा मतदार संघात येणाऱ्या…
Internet marketing strategies - five different strategies for online income So it's period again. The…