लेखक: रणजित मेश्राम, जेष्ठ साहित्यिक, लेखक
मराठी लेख: मानवी जीवनात , जबाबदारीची अत्युच्च कसोटी याअर्थाने ६६ वर्षाआधी नागपुरात घडलेले धम्मचक्रप्रवर्तन यास म्हणता येईल. बाबासाहेब आंबेडकर हे महामानव असले तरी माणूस होतेच ! एका माणसावर कोट्यवधी माणसांच्या व पिढ्यांच्या जीवनपरिवर्तनाचा निर्णयक्षण येणे असे जगात क्वचितच घडले असेल. पण ते घडले. अन् यशस्वी झाले !
या महत्क्षणाला व प्रवासाला खूप विचारपूर्वकता आहे. एकाच हयातीत हे घडले ! हीही कदाचित जागतिक क्वचितता असावी ! बाबासाहेबांनी १९१८-२० दरम्यान सार्वजनिकतेला प्रारंभ केलाय. पहिल्या दिवसापासून त्यांनी मुक्तीवाट धरली. अनेक पातळ्यांवर बंदद्वार उघडत उघडत ते निश्चितीकडे निघाले. लोक जुळत गेले. या जुळण्यात विश्वास हा पाया होता. प्रवास अवघड राहीला. जेव्हढे बाबासाहेबांना प्रेम मिळाले त्याच्या कैक पट जास्त निंदा सहन करावी लागली. बाबासाहेब अडिग राहीले.
लिहून, सांगून, बोलून त्यांनी, हिंदू धर्मात राहून तुमचा उत्कर्ष होईल काय हे विचारले ! यात उत्कर्ष हा प्रमुख बिंदू होता. या उत्कर्षात , तुमच्या वाट्याला हे जे दुःख आहे ते मानवनिर्मित कसे? हे आधी समजून घ्या. अदृश्य शक्ती, गेल्या जन्मीचे पातक , पूढच्या जन्मीचा सुखावा , धर्माधिष्ठित , ईश्वरनिर्मित असे काहीही नसते ! सर्व मानवनिर्मित आहे. काहींच्या सुखासाठी , बहुंची बंदीशाळा अशी ही कठोर कैद आहे ! हे पटवून दिले. इथून सुटता येते. मार्ग एकच ! हिंदूधर्मसख्य सोडावे लागेल. दूसरा मार्ग नाही. तेव्हाच बुध्दीशी सख्य , तार्किकतेशी गट्टी, विकासाची सुखवाट, संधीची संधी, समतेचा निवारा, स्वातंत्र्याचा श्वास तुम्हाला मिळेल. तुमचा काही अपराध नसताना ही झालेली जघन्य कैद आहे. हे समजून घ्या !
जो धर्म दैन्यावस्था देतो तिथे रहावे काय ? माणसासाठी धर्म की धर्मासाठी माणूस ? भूक आणि मन दोन्हींची क्षुधाशांती कशी व्हायची ? असे हे प्रश्नमूलक विचारणे होते. हळूहळू लोकांना हे पटले. पटायला लागले. हिंदूधर्म सोडण्याचा कल पक्का होत गेला. जगातील हे थोर मनपरिवर्तन होते. पावलापावलावर ईश्वराला स्मरणारी व भीणारी माणसं या स्तरावर येणे साधे नव्हते ! ही एक अभूतपूर्व चाहूल होती !
या सर्व प्रक्रियेत बाबासाहेब चौफेरतेवर सूत्रधार होते. आंदोलने, सभा, परिषदा सुरुच होत्या. अशाच जागरणात बाबासाहेबांनी १३ आक्टोबर १९३५ ला येवले (नाशिक जिल्हा) मुक्कामी आपल्या भूमिकेला अधिक स्पष्ट केले. या जाहीर परिषदेत त्यांनी जाहीर केले की , हिंदू धर्मात जन्माला येणे हे माझ्या हाती नव्हते. पण हिंदू म्हणून मी मरणार नाही ! या घोषणेने हिंदू धर्म सोडण्यावर शिक्कामोर्तब झाले !
घोषणेने खळबळ उडाली. वातावरण तापले. मोठी दखल घेण्यात आली. ही दखल बाजूने होती. ही दखल विरोधातही होती. विरोधाचे प्रमाण अधिक होते. टिळकांच्या केसरीने तेव्हा स्फुट लिहिले. फुटकी होडी, घातकी नावाडी !
या घोषणेची सर्वाधिक उत्कंठा दलितांना होती. बाबासाहेबांनी अजिबात उसंत न घेता उत्कंठापूर्ती केली. जागोजाग धर्मान्तर का ? परिषदा लागल्या. ४ मे १९३६ (अमरावती), १७ मे १९३६ (कल्याण) , ३०,३१ मे १९३६ (नायगाव-मुंबई) येथे परिषदांचे आयोजन झाले. बाबासाहेब विस्ताराने धर्मान्तरामागची भूमिका स्पष्ट करीत होते. नायगाव, मुंबईचे तेव्हाचे भाषण .. मुक्ती कोण पथे म्हणून फार प्रसिद्ध आहे. आता बाबासाहेब कोणता धर्म घेणार याकडे उत्सुकता लागली. हा काळ बाबासाहेबासाठीसुध्दा सर्वाधिक कठीण काळ होता. स्पष्ट निर्णयघोषणैला त्यांनी २० वर्षे घेतली. यावरून ही कठीणता लक्षात येईल.
धर्मान्तर घोषणेचे पडसाद सर्वत्र उमटले. प्रामुख्याने मुस्लिम , ख्रिस्ती , शीख व बौद्ध धर्माच्या प्रमुखांनी मोठी दखल घेतली. त्यांनी बाबासाहेबांना प्रत्यक्ष भेटून आपला धर्म स्वीकारण्याची विनंती केली. बाबासाहेबांनी सर्व धर्मांचा खोलवर अभ्यास करणे सुरू केले होते. त्यांना आधीपासून बौद्ध धर्म आवडत असला तरी संपूर्ण अभ्यास करणे गरजेचे होतेच ! सर्व धर्मांचा अभ्यास करताना धर्म व प्रत्यक्ष जीवन याचाही कानोसा घेतला. कोट्यवधी दलितांचे समायोजन व स्थान हीही बाब होतीच. हिंदू धर्म सोडताना , रागाची व्यक्तता अशी मर्यादित बाब नव्हती. किंवा प्रतिक्रिया म्हणून धर्मबदल एव्हढेच नव्हते ! धर्मत्यागामागे मानवी जीवनाच्या पूर्णतेची पूर्तता हे खरे उद्दिष्ट होते. शिवाय भारतीय संस्कृतीची सांगड हेही होते. ते कुठे मिळेल हा खरा बाबासाहेबांचा शोध होता ! हा शोध बुध्दाजवळ थांबला !२४ मे १९५६ रोजी नरेपार्क मुंबई येथे भगवान बुध्दाच्या २५०० व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजन होते. या आयोजनात बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारण्याचे स्पष्ट केले. त्यानंतर तारीख व स्थळ यासाठी धावपळ सुरू झाली.
धर्मान्तराची म्हणजेच बौद्ध धर्म स्वीकारण्याची वातावरणनिर्मिती जबरदस्त झालेली होतीच ! दसरा-१४ आक्टोबर ही तारीख बाबासाहेबांनी पक्की केली. स्थळासंदर्भात आधी मुंबईचा विचार झाला होता. नंतर नागपुरला निवडले. आपण नागपूर का निवडले याचा खुलासा बाबासाहेबांनी धम्मदीक्षेनंतरच्या प्रमुख भाषणात केलेला आहे. या धम्मदीक्षेला ७ लाख लोक हजर होते. जगातील ही अभूतपूर्व घटना आहे. आधी महास्थवीर चन्द्रमणी यांनी बाबासाहेबांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. नंतर बाबासाहेबांनी उपस्थित ७ लाख लोकांना बौध्ददीक्षित केले. उपासकाच्या हस्ते दीक्षा, हाही महान क्षण होता !
यानिमित्ताने १३, १४, १५ आक्टोबर असे तीन दिवस बाबासाहेब नागपुरात होते. १३ तारखेला त्यांची वार्तापरिषद झाली. काही दैनिकांनी स्वतंत्र मुलाखती घेतल्या. दूसऱ्या दिवशी १४ आक्टोबरला धम्मदीक्षेचा कार्यक्रम झाला. त्यावेळी छोटेखानी भाषण बाबासाहेबांनी केले. प्रमुख भाषण मात्र १५ आक्टोबरला सकाळी १० ते १२ यादरम्यान झाले. याभाषणात बाबासाहेबांनी धम्मस्वीकाराची संपूर्ण स्पष्टता केली. १६ आक्टोबरला चन्द्रपुरला धम्मदीक्षा होती. इथे बाबासाहेब, माईसाहेब आले. पण भाषण केले नाही.
पूढची दीक्षा मुंबईला १६ डिसेंबरला ठरलेली होती. पण अचानक आभाळ फाटले. बाबासाहेबांचे ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण झाले. ७ डिसेंबरला चैत्यभूमी मुंबई येथे अन्त्यसंस्कार झालेय. याप्रसंगी जडमनाने धम्मदीक्षा देण्यात आली. पूढे १६ डिसेंबरचा प्रस्तावित दीक्षा कार्यक्रम २६ जानेवारी १९५७ ला पुरंदरे स्टेडियम , मुंबई येथे घेण्यात आला. लक्षावधी लोकांना भदन्त आनंद कौसल्यायन यांनी याप्रसंगी बौद्ध धर्माची दीक्षा दिली.
असा हा धर्मान्तराचा प्रवास राहीला. सोडणे आणि स्वीकारणे या हिंदोळ्यावर सोडणे विस्मरणात सरत गेले. स्वीकारणे विकसित होत गेले. विस्तारित होत गेले. देशविदेशातील बौध्दांशी नवे नाते जुळले. नवे बंध फुलले. भविष्यात कोट्यवधींची धम्मदीक्षा झाली तर नवल नको ! जगण्याच्या इच्छेचा पौर्णिमेसारखा विकास होणे हीच खरी विकसितता ! नेमका हाच बौद्ध विचाराचा गाभा आहे. हा गाभा हीच धम्मधारा झालीय. ही धारा वाहती आहे .. प्रवाही आहे .. जीवनदायीनी आहे ! धम्म हे जगण्याचे धन होऊ शकते , याची ही विलक्षण अनुभूती आहे !
धर्मान्तरानंतरचा धम्मप्रवास सुरू आहे !
महाराष्ट्र संदेश न्युज आपल्या परिसरातील बातम्या करिता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक मोबाईल नंबर 7385445348/9766445348
*निर्वाचन क्षेत्रात उपस्थित होताच सिरोंचा दौऱ्यावर* मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809. अहेरी:नागपूर…
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…