लेखक :- श्री मयुरेश्वर रोहिदास सोनवणे
उपशिक्षक, बालमोहन विद्यालय, चोपडा
लोकशाहीर, लोकसाहित्यिक, गायक, नाटककार, कार्यकर्ता, परखड वक्ता, समाजाचे कैवारी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगावच्या मातंग वाड्यात झाला. दलित, अशिक्षित, गरीब, गावाबाहेर अंधाऱ्या वस्तीत पिढ्यानपिढ्या पिचकळत पडलेला समाजातील वालुबाई व भाऊराव या दांपत्याची पोटी जन्मलेल्या बाळाचे नाव ठेवले तुकाराम.
बालपणी जातीय व्यवस्थेचे अनेक चटके अण्णाभाऊंना सहन करावे लागले. दांडपट्टा खेळणे, कुऱ्हाड चालवणे, परिसरातील जत्रांना हजेरी लावणे, तमाशा मन लावून पाहणे, लावण्या पाठ करणे, वृद्ध मंडळीकडून शौर्य कथा ऐकणे व मित्रांना सांगणे असे अनेक छंद तुकारामांना होते. तुकारामांचा भाऊ शंकर व मित्र त्यांना तुझ्या नावाने हाक मारत एके दिवशी आई त्यांना रागावली. तुकाराम तुमच्यापेक्षा वयाने मोठा आहे म्हणून त्याला अण्णा या नावाने हाक मारत जा तेव्हापासून त्यांचे अण्णा नाव प्रचलित झाले.
वेळ आली आता अण्णांना शाळेत दाखल करायची. भाऊरावांपुढे प्रश्न होता पाटी, पेन्सिल, पुस्तके, कपड्यांचा? कसेतरी हे साहित्य मिळवले व शेवटी अण्णांना हात धरून भाऊराव शाळेकडे निघाले कारण मुंबईतील उच्च शिक्षित लोकांचे जीवन त्यांनी जवळून पाहिले होते. म्हणून आपल्या मुलांनी शिकावं व समृद्ध जीवन जगावं अशी त्यांची इच्छा. शाळेत आल्यावर भाऊरावांना तुकारामाची जन्म तारीख सांगता आली नाही म्हणून गुरुजी त्यांच्यावर रागावले. ज्या घरात शिक्षण काय असते हे माहीत नाही त्या घरात अण्णांनी शिकावं, खुप मोठं व्हावं हा निश्चय करून अण्णांचे पाऊल शाळेच्या उंबरठ्यावर पडले. भाऊराव अण्णांना शाळेत बसवून घराकडे गेले. कधी पाटी, पेन्सिल, पुस्तकाला स्पर्श केला नसल्यामुळे अवघड वाटत होते. जनावरे कोंडवाड्यात कोंडावीत तशी अण्णांची अवस्था. विविध जातीचे मुले वेगवेगळी बसलेली होती कारण त्यावेळी जातीयवाद होता. उच्च निच असा भेदभाव होता. गुरुजींनी अ, ब, क, ड…. गिरवायला लावले. पण अण्णांना गिरवता येईना. आजूबाजूची मुले तुझं डोस्क हाय की गाडग हाय असे म्हणून चिडवायला लागले.
प्रखरपणे अण्णांनी उत्तर दिले. अजून मला एक दिवस होतोय. शहाणपण शिकवू नका. उद्या परवा चार दिवसांनी कुठपर्यंत येत ते बघू. मी इतका लिहिणार आहे की गावात कोणी लिहिणार नाही आता गप्प बसा. उगाच डोकं फिरवू नका अश्या कणखर शब्दात आपल्या बोलीभाषेत अण्णा उत्तरले. परंतु प्रत्यक्ष हे शब्द खरे निघाले. अण्णांनी जे लिहिले ते सातासमुद्रापार पोहचले.
दुसऱ्या दिवशी अण्णा शाळेत आले. गुरुजी अभ्यास पाहू लागले. गुरुजींनी दिलेले शब्द अण्णांना गिरवता आले नाही. गुरुजी चिडून म्हणाले “लेका, गाढवा कालपासून चार अक्षरे गिरवतोय तु माणूस आहे की जनावर?” अण्णा नम्रपणे म्हणाले. गुरुजी मी कालच आलुया… तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही. जरा दमानं येईल हे ऐकुन गुरुजी संतापले व म्हणाले घोड्याएवढ्या झालास अन चार अक्षरे गिरवता नाही आली. वरून तुपाच्या अन् रूपाच्या गोष्टी करतोस. गुरुजींनी रागाच्या आवेशात हातावर छड्या मारल्या बोटं अक्षरशः ठेचून काढली.
मधली सुट्टी झाली. अण्णांना गुरुजींचा खुप राग आला. पुन्हा पुन्हा ही चूक केली असती तर मी समजू शकलो असतो पण अमानुष हल्ला माझ्यावर केला याचे वाईट वाटले. मधली सुटी भरल्यावर अण्णांनी एक दगड गुरूजींकडे भिरकावला. उतरत्या वयामुळे गुरुजी कोसळले. इकडे अण्णांनी शाळेला कायमचा रामराम ठोकायचा असा निश्चय करून घराकडे पळू लागले. पकडा त्याला….. असे गुरुजी बोलताच मुले अण्णांच्या मागे पळाली.मातंग वाड्यात मुले आल्यावर अण्णा मुलांना म्हणाले. या इकडे तुमचं पण डोस्क फोडतो अण्णांचा अवतार पाहून मुले धूम पळाली.
अण्णा दिवसभर घरी फिरकले नाही. इकडे गुरुजी मातंग वाड्यात आले. भाऊरावांना सर्व प्रकार कथन केला. असंख्य स्वप्न उराशी बाळगून शिक्षण घेण्यासाठी पाठवलेल्या मुलाचा हा विचित्र प्रकार पाहून भाऊराव गोंधळात पडले. त्यांना वाईट वाटले. किलवाण्या तोंडाने ते गुरुजींची क्षमा मागू लागले. शेवटी गुरुजी रागात निघून गेले.
दिवेलावणीची वेळ झाली पण तुझ्या घरी आला नाही. काळजी पोटी भाऊराव व वालूबाई शोधास निघाले. एका घरात लपलेल्या तुक्याला त्यांनी बाहेर काढले. अण्णा रडू लागले व आपला हात वडिलांना दाखवला. ठेचून काढलेली बोटे, रक्तबंबाळ हात पाहून वाईट वाटले. पोरं शिकवायची की गुरासारखं मारायचं? संताप व्यक्त करत घरी आले. गुरुजी मात्र येथे थांबले नाही. असे सहन केले तर उद्या कोणीही मारेल म्हणून ते गावच्या पंतांकडे गेले. पंतांनी भाऊराव व तुकारामांना बोलावले. भाऊराव घाबरले पण पंतांचे बोलावणे टाळले तर अनर्थ होईल.ह्या भीतीने हिंमत करून वाड्यावर गेले. पंतांनी अण्णांचा हात पाहिला अन् अवाक् झाले. गुरुजींना म्हणाले गुरुजी.. संत ज्ञानेश्वरांनी रेड्यामुखी वेद बोलविला होता तो रेडा कोण होता? तुम्ही ज्ञानेश्वर होवून समाजाला ज्ञान द्या. ज्ञानापासून दूर लोटू नका. पुढे हाच मुलगा तुक्याचा तुकाराम होईल. शिकला तर काहीतरी ज्ञान समस्त मानवजातीस देवून जाईल. गुरुजी चोरपावलांनी वाडा उतरले.इकडे दिड दिवसाची शाळा पूर्ण करून अण्णांनी शाळेला रामराम ठोकला.
मावसभावाच्या तमाशा पार्टीत काम करताना क्रांतीसिंह नाना पाटलांचे भाषण ऐकले. त्यांच्या विचारांनी प्रभावित होवून १६ वर्षाचे असताना भूमिगत पद्धतीने स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नोंदविला. मुंबईत आल्यावर देशभक्तांचे विचार ऐकले. कम्युनिस्ट पार्टीचे काम करू लागले पण पोटाची थडगी भरण्यासाठी हमाल, खाण कामगार, हॉटेल बॉय, ड्रेसिंग बॉय, बूट पॉलिश इ. कामे केली.
अण्णांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी समाज परिवर्तनाचा विचार डोळ्यात ठेवून आपले कार्य तमाशात केले. म्हणून तमाशा या शब्दावर बंदी आली. दुरदृष्टी ठेवून तमाशा हा शब्द वापरण्याऐवजी लोकनाट्य असे नाव दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श ठेवून अनेक समस्यांना सामोरे गेले.
दिड दिवसाची शाळा शिकलेल्या माणसाने झोपलेल्या, गरीब, दारिद्री, अज्ञानी समाजाला जागृत केले. राष्ट्रभक्तीची ज्योत प्रखर केली. सामाजिक बांधिलकी ठेवून लेखणी चालवली. अनेक कथा, कादंबऱ्या, पोवाडे समाज जागृतीकरिता जगापुढे ठेवले.
अण्णा भाऊंच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस विनम्र अभिवादन!!!!
श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर/बीड:- देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्र्यांच्या…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- दिनांक 13 डिसेंबर ते…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- यवतमाळ येथे दि 13…
चार -पाच दिवसांपूर्वी घटना घडल्याचा वनविभागाचा अंदाज, मृतकाच्या परिवाराला तात्काळ मदत मिळावी - नैसर्गिक पर्यावरण…
बीड घटनेची न्यायालयीन, एसआयटीमार्फत दुहेरी चौकशी, पोलीस अधिक्षकांची बदली, परभणीतील घटनेची न्यायालयीन चौकशी होणार; पोलीस…
अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सद्यस्थितीत पाश्चिमात्य संकल्पनांना भुललेली…