पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- पोलीस मित्राच्या अपघाती मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या संकटावर मात करण्यासाठी पुणे पोलीस दल मदतीसाठी पुढे सरसावले आहे. पुणे पोलीस दलातील अमलदार नितीन शिंदे यांचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले होते.
त्यानंतर मैत्रीच्या नात्यातील ओलावा जपण्यासाठी 2007 च्या पोलीस बॅचमधील प्रत्येकाने 1 हजार रुपयांपासून 10 हजारांपर्यंत असे मिळून तब्बल 11 लाख रुपये गोळा केले आहेत. एकत्रित सर्व रक्कम दिवगंत नितीन यांच्या मुलींच्या नावे बँकेत फिक्स डिपॉजिट (एफडी) केली जाणार आहे, अशी माहिती मदत गोळा करणाऱ्या मित्रांनी दिली आहे.
पुणे पोलीस दलातील अमलदार नितीन दिलीप शिंदे भरोसा सेलमध्ये कार्यरत होते. 31 जानेवारीला सोलापूरहून पुण्याला येत असताना खासगी आरामदायी बसचा अपघात झाला. त्यामध्ये नितीनचा मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर 2007 पोलिस बॅचमधील त्याच्या मित्राने नितीनच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत गोळा करण्याचा निश्चय केला. सोशल मीडियाद्वारे एकमेकांना आवाहन करताच, प्रत्येकी 1 हजारांपासून 10 हजारांपर्यंत मदत गोळा करण्यात आली. अवघ्या काही दिवसांतच तब्बल 11 लाखांवर रक्कम गोळा करण्यात आली आहे. नितीन आमच्या आठवणीत कायमस्वरूपी राहावा, यासाठी थोडी आर्थिक मदत करण्याचा प्रयत्न केल्याचे मित्रांनी सांगितले. दरम्यान, नितीनने हडपसर पोलीस ठाणे, नीट सहा या ठिकाणी काम केले होते. अॅथलेटिक्समध्ये तो उत्तम खेळाडू होता.
दिवंगत अंमलदार नितीन शिंदे यांच्या पत्नीला पोलीस दलात अनुकंपा तत्वावर सामावून घेण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांनी काही दिवसांपूर्वी नितीन यांच्या पत्नीला बोलावून मार्गदर्शन केले आहे. त्या शिवाय कागदपत्रे जमा करण्याचे सूचित केले आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नितीनच्या कुटुंबीयाविषयी सहानुभूती व्यक्त केली आहे.