✒️राज शिर्के, मुंबई (पवई) प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नवी दिल्ली:- राज्यसभेमध्ये वारंवार गोंधळ घालणाऱ्या 12 खासदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे, यामध्ये महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या दोन खासदारांचा समावेश आहे. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी संसदीय समितीला वेलमध्ये येणाऱ्या, घोषणाबाजी करणाऱ्या आणि सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणणाऱ्या या खासदारांची चौकशी करायला सांगितली आहे. राज्यसभेने दिलेल्या बुलेटिननुसार यामध्ये काँग्रेसचे 9 तर आम आदमी पार्टीचे 3 असे एकूण 12 खासदार आहेत.
काँग्रेस खासदारांमध्ये शक्तीसिंग गोहील, नारनभाई जे राठवा, सैय्यद नासीर हुसैन, कुमार केतकर, इमरान प्रतापगडी, एल हनुमंथैय्या, फूलो देवी नेताम, जेबी माथेर हिशम आणि रंजीत रंजन यांचा समावेश आहे. यातले कुमार केतकर आणि इमरान प्रतापगडी हे महाराष्ट्रातून राज्यसभेत गेले आहेत. आपच्या तीन खासदारांमध्ये संजय सिंग, सुशील कुमार गुप्ता आणि संदीप कुमार पाठक यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी विशेष अधिकाराचं उल्लंघन होत असल्याचं सांगत प्रश्न उपस्थित केला आहे. विरोधी खासदार वारंवार वेलमध्ये प्रवेश करत आहेत, घोषणाबाजी करत आहेत आणि जाणूनबुजून राज्यसभेच्या कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत. हे करणं राज्यसभेचे नियम आणि शिष्टाचाराच्याविरोधात आहे, असं सभापतींचं म्हणणं आहे. या महिन्याच्या सुरूवातीला संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवरून विरोधी पक्षांचे खासदार राज्यसभेत गोंधळ घालत होते.