✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- आज या धावपळीच्या युगात अनेक तरुण-तरुणी अगदी शुलक कारणामुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. आपल्या आई वडील यांच्या बरोबर जरासाही वाद झाला की असे तरुण तरुणी कुठलाही विचार न करता घर सोडून जाण्याच्या घटना समोर येत आहेत. कुणी चंदेरी दुनियेत जाण्यासाठी, तर कुणी आईवडिलांवरील रागावर घर सोडून जातं. असाच एक प्रकार समोर आला आहे.
अशीच एक खळळजनक घटना समोर आली आहे. आईवरील रागामुळे एका 16 वर्षीय अलपवयीन मुलीने घर सोडले आणि ती थेट चेन्नई येथून मुंबईला पोहोचली. मात्र, वर्ध्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मध्यस्थिने 10 तासात या मुलीच्या शोध घेण्यात आला आणि या मुलीची तिच्या आईशी सुखरूप भेट झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबच्या लुधियाना येथील १६ वर्षीय मुलगी तिच्या आईच्या नोकरीमुळे काही महिन्यांपासून चेन्नईला राहत होती. आई आणि मुलीत वाद झाल्याने मुलीने रागात घर सोडले. याप्रकरणी चेन्नई येथील निलांबरी पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.
शनिवारी चेन्नई येथील डीआयजी टी. महेशकुमार यांचा वर्ध्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांना फोन आला. त्यांनी मिसिंग मुलीचे मुंबई येथे लोकेशन दाखवत असल्याचे सांगून शोधकार्यात मदत करण्याची विनंती केली. संजय गायकवाड वर्ध्यात रुजू होण्यापूर्वी मुंबई येथेच नोकरीवर असल्याने त्यांनी लगेच मुंबई येथील त्यांच्या ओळखीच्या पोलिस निरीक्षक राजेंद्र गोडसे, दत्ता म्हसवेकर, विजय जाधव यांना फोन करून याची माहिती दिली.
संजय गायकवाड हे वेळोवेळी मुंबई तसेच चेन्नई येथील पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून लोकेशन ट्रेस करत होते. अखेर मुलगी जुहू परिसरात मुंबई दर्शन करवणाऱ्या बसमध्ये बसून असल्याचे समजले. बसचालकाने मोठ्या शिताफीने बस हळुवार चालवून पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बस थांबवून मुलील ताब्यात घेतले आणि तिच्या आईच्या स्वाधीन केले. हे ऑपरेशन सुमारे 10 तास चालले.
मुलीचा मोबाइल सुरू असल्याने तिचे लोकेशन पोलिसांना मिळत होते. मात्र, ती मुंबई दर्शन करणाऱ्या बसमध्ये बसून असल्याने वारंवार तिच्या मोबाइलचे लोकेशन बदलत होते. कुलाबा, मरीन ड्रायव्ह, पेडर रोड, कॅम्प कॉर्नर, ब्रीज कॅन्डी, महालक्ष्मी मंदिर असे दाखवत होते. पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी तत्काळ संपर्क साधून तांत्रिक पद्धतीने तपास करून अखेर मुलीचा शोध लावला.
पोलीस निरीक्षक संजय गायकवाड हे सहा वर्षांपूर्वी मुंबईलाच कार्यरत होते. ते तामिळनाडू येथील कृष्णगिरी येथे तपासकामी गेले असता तेथे त्यांची ओळख पोलिस अधीक्षक टी. महेशकुमार यांच्याशी झाली होती. त्यामुळे सध्या चेन्नईत डीआयजी असलेल्या टी. महेशकुमार यांच्या मदतीला संजय गायकवाड धावून आले आणि मुलीला सुखरूप शोधण्यात यश मिळवले.