बालाजी शिंदे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सोलापूर:- जिल्हा तून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे एकाच घरातील तीन महिलांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेने संपूर्ण सोलापूर जिल्हा हादळला आहे. या तिहेरी हत्याकांडाच्या घटनेनंतर या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. या हत्येप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
नंदेश्वर येथील हॉटेल व्यावसायिक महादेव माळी यांच्या दोन बहिणी आणि सुनेची अज्ञात कारणाने दगडाने ठेचून हत्या झाल्याचे समोर आले आहे . महादेव माळी यांच्या मातोश्रीचे निधन काही दिवसापूर्वी झाले होते. यासाठी माळी यांच्या दोन विवाहित बहिणी शेतातील वस्तीवर राहण्यासाठी आल्या होत्या. दरम्यान महादेव माळी हे गावातील हॉटेलकडे तर त्यांचा मुलगा बंडू हा त्याच्या कापड दुकानाकडे गेल्यावर दुपारी हा धक्कादायक प्रकार घडल्याचे सांगितलं जात आहे.
दुपारी 12 ते 2 च्या दरम्यान मृतातील एक महिला बाहेर कपडे धुवत असताना तिच्यावर या अज्ञाताने दगडाने हल्ला केल्याचे सांगितले जातंय. नंतर दुसरी बहीण आणि सून पळून जात असताना त्यांच्यावरही हल्ला करून हत्या केल्याचं सांगितलं जातं. सुदैवाने या सुनेची चार महिन्याची मुलगी घरातच होती. मात्र या नराधमाला तिची माहिती नसल्याने ती यातून वाचली.
इतक्या क्रूरपणे झालेल्या या हत्याकांडामुळे हा परिसर हादरून गेला आहे. या घटनेची माहिती मिळताच मंगळवेढा येथील पोलिस उपाधीक्षक राजश्री पाटील आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमत जाधव घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु केला आहे. या प्रकरणात शेजारीच राहणाऱ्या एका तरुणाला संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडे अधिकच तपास सुरु केला आहे. याबाबत अजून पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी यातील संशयित आरोपीपर्यंत पोलिस पोहोचल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे.