सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. चंद्रपूर मार्गावरील महापारेषणच्या पॉवर हाऊस परिसरात सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास एक बिबट्या मृतावस्थेत आढळला. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने या बिबट्या मृत्यू काही दिवसा आगोदर झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
बल्लारपूर चंद्रपूर महामार्गाच्या बाजूला जुन्या पॉवर हाऊस परिसरात नवीन विद्युत सबस्टेशनच्या मागच्या बाजूला प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूरचे विद्युत केबल लाइन टाकण्याचे काम सुरू आहे. केबल लाइनचे काम करणाऱ्या मजुराला सोमवारी दुपारच्या सुमारास एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती महापारेषणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. त्यांनी तत्काळ बल्लारपूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांना माहिती कळवली. वन कर्मचारी लगेच घटनास्थळावर पोहोचले. त्यांनी मृत बिबट्याला पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वन्यजीव उपचार केंद्रात पाठवले.
दरम्यान, या बिबट्याचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला, याबाबत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच कळेल, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले. बिबट्याचे सर्व अवयवही शाबूत आहेत. घटनेचा तपास उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू व सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे करीत आहेत.