श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन केज:- बीड जिल्ह्यात १५० वर्षांची एक अनोखी परंपरा गावकरी आजही पाळत आहेत. केज तालुक्यातील विडा येथील मानकरी जावयास रंग लावून आज धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून मिरवणूक काढली जाते 150 वर्षाच्या परंपरेचे यंदाचे मानकरी जावई म्हणून जवळबन येथील अविनाश करपे यांची विडेकरांनी निवड केली. ते जवळबन येथे झोपेत असतानाच सोमवारी मध्यरात्री 2 वाजता निवड समितीने त्यांना ताब्यात घेतले.
विडा येथील जावयाची धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून ढोल, ताशा, आणि डीजे च्या तालावर गावातून मिरवणूक काढली जाते. त्यामुळे धुलिवंदनाची चाहूल लागताच विडेकरांचे सर्व जावई आपले मोबाईल स्विचऑफ़ करून भूमिगत होतात. दरम्यान, तीन दिवसांपासून विडेकरांनी नेमलेली समिती मानकरी जावयाच्या शोधात होती. अखेर सोमवारी रात्री 2 वाजता जवळबन येथून झोपेत असताना जावई अविनाश करपे यांना ताब्यात घेण्यात आले. लागलीच त्यांना मोठ्या सन्मानाने गावात आणण्यात आले. त्यांना रंग लावून गाढवावर बसवत विडा गावातून मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे, मिरवणुकीनंतर जावयाला नवीन कपड्याचा आहेर व सासरच्या मंडळीकडून सोन्याची अंगठी देण्यात आली.
150 वर्षाची परंपरा: दीडशे वर्षांपूर्वी थट्टा मस्करी मधून विडा येथील आनंदराव देशमुख यांनी आपल्या जावयाला गाढवावर बसवून गावातून मिरवले होते. याचेच रूपांतर नंतर दरवर्षी गावच्या जावयाला गाढवावरून मिरवणूक काढण्यात झाले. तेथूनच या रूढी परंपरेला प्रारंभ झाला.ही परंपरा खंडित होऊ द्यायची नाही म्हणून गावकरी दरवर्षी गावच्या जावयाचा शोध घेत त्याची गाढवावरून मिरवणूक काढतात.