वैशाली गायकवाड उपसंपादक (पुणे)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यात आपल्या विविध मागण्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस जागतिक महिला दिनी दिनांक 8 मार्च ला प्रशासना विरोधात एल्गार पुकारून मोर्चा काढणार आहे. या मोर्चात पुणे जिल्हातील हजारो महिला सहभागी होणार आहे.
बुधवार दि. 8 मार्च जागतिक महिला दिनी सकाळी 11 वाजता अंगणवाडी सेविका पुण्यातील जिल्हाधिकारी कचेरी समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून काळे वस्त्र किंवा फिती लावून विभागीय उपायुक्त, महिला बाल विकास, सामाजिक न्याय आयुक्त कार्यालयावर अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र पुणे च्या नेतृत्वाखाली अनवाणी मोर्चा काढतील. तेथे पोहोचल्यावर या मदतीनिस आणि अंगणवाडी सेविका 8 मार्च हा महिलांच्या कौतुकाचा दिवस, लाक्षणिक उपोषण करून आपल्या अन्याय विरुद्ध दाद मागणार आहेत.
पूर्व प्राथमिक शिक्षण, पूरक पोषक आहार, लसीकरण, लोकसंख्या शिक्षण इत्यादी द्वारे त्या देशाची भावी पिढी घडवतात. मात्र अतिशय अल्प मानधन देऊन त्यांची बोळवण केली जाते. तसेच विविध निर्णय घेताना त्यांचा न्याय हक्क डावलला जातो.
नुकताच मदतनीस यांना सेविका होण्यासाठी पूर्वी जी इयत्ता दहावीची अट होती. ही बदलून आता बारावी पास करण्यात आली आहे. त्याआधी सेविका पदी नियुक्ती होण्यासाठी अनेक मदतनीसांनी अर्धवट शिक्षण पुन्हा सुरू करून मधल्या वयात दहावी पास चे शिक्षण घेतले. दरम्यानच्या काळात सेविकांची भरती केली नाही. मात्र आता 2 फेब्रुवारी 2023 रोजी सेविका पदी मदतनिसांच्या थेट नियुक्तीचा आदेश निघाला असून त्यात शिक्षणाची अट बारावी करण्यात आली आहे. यामुळे 15- 20 वर्षे अतिशय प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मदतनीसांचा भ्रमनिरास झाला असून त्या अतिशय निराश झाल्या आहेत.
असाच अनुभव मुख्य सेविका म्हणजे पर्यवेक्षक पदी भरतीसाठी सेविकेचे वय आता कमाल 45 करण्यात आले आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष मुख्य सेविका होण्याचे स्वप्न बघणाऱ्या आणि आता वय 45 पुढे गेलेल्या सेविकांचे स्वप्न भंग पावले आहे. म्हणून या अन्याया विरुद्ध येत्या 8 मार्च जागतिक महिला दिन या दिवशी महिला अन्याय विरोधी दिन पाळण्यात येणार आहे.
महिला विकासासाठी स्थापन झालेल्या महिला बालविकास पुणे विभागीय उपायुक्त कार्यालयासमोर सायंकाळी पाच वाजेपर्यंत लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी महाराष्ट्र सभेचे निमंत्रक नितीन पवार यांनी दिली.