श्याम भूतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- नुकतेच नागालँड राज्यात ६० पैकी ३७ जागा मिळालेल्या भाजपला अन्य पक्षांनी समर्थन जाहीर केले. तिथे खरे म्हणजे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या समर्थनाची काही एक गरज नसताना व त्यांच्याकडून तशी ऑफर ही नसताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समर्थन जाहीर करून स्वतःला तिथे बिन बुलाये मेहमान सिद्ध केले आहे. मात्र त्यांच्या या कृतीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपची बी टीम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले असून त्यांनी दिलेले समर्थन म्हणजे आता उघडा डोळे पहा नीट नागालँड मध्ये भाजप सोबत राष्ट्रवादी काँग्रेस फिट असे एआयएमआयएम चे बीड जिल्हाध्यक्ष अॅड. शेख शफिक यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
याविषयी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सेक्युलर पणाचे ढोंग करत असून सेक्युलर बुरख्याच्या आडून जातीयवादी पक्षांसोबत कुठे उघड तर कुठे आतून हात मिळवणी करत आहे. अशाच प्रकारे देशाच्या लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सर्वोच्च सदनात सीएए, एनआरसी आणि ट्रिपल तलाक प्रश्नावेळी अनुपस्थित राहून भाजपला छुपे समर्थन दिले होते. महाराष्ट्रात सुद्धा अंधाऱ्या रात्री भाजप सोबत हात मिळवणी करून पहाटेच शपथविधी उरकल्याचे जनतेला चांगलेच ठाऊक आहे. राजकीय क्षेत्रात त्याची छी-थू झाल्यानंतर पटकन यु टर्न घेत शिवसेनेसोबत हात मिळवणी करत सोबत मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसलाही घेऊन राज्यात तिघाडी सरकार बनविली हे सर्वज्ञात आहे. महाराष्ट्रात तरी दुसऱ्या फळीचे नेते असलेले अजित पवार यांना भाजपशी सलगी करण्या करिता पुढे करण्यात आले होते. तसेच २०१४ सालीही राष्ट्रवादी पक्षाचे वजनदार नेते असलेले प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा पक्षासोबत चर्चा करून आम्ही महाराष्ट्रात स्थिर सरकारसाठी भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ असे जाहीर केले होते.
यावेळी तर नागालँड मध्ये दस्तूरखुद्द पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच भाजपला समर्थन देऊन आपला खरा चेहरा उघड केला आहे. यामुळे आता त्यांच्या सेक्युलिरेझमचा बुरखा टराटरा फाटला आहे. यातून आता जनतेने बोध घेण्याची आवश्यकता आहे असे शफिक भाऊ यांनी स्पष्ट केले आहे.
शरद पवार यांचे हास्यास्पद वक्तव्य
नागालँड मध्ये भाजपला पाठिंबा देताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलेले वक्तव्य मुरब्बी राजकारणाचे नसून हास्यास्पद आहे. ते म्हणतात की, राष्ट्रवादीने भाजपला नाही तर नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री भाजप समर्थित एनडीपीपीचा तर पाठिंबा कुणाला ? जनतेला वेड्यात काढले जात आहे की, आजच्या युगातही ते जनतेच्या गळ्यात रेडू आणि नाकात बिडी असल्याचे समजत आहे.
ताठ मानेने विरोधक म्हणून बसता आले असते
नागालँड मध्ये भाजपकडून ऑफर नसतानाही तसेच भाजपला इतर पक्षांनी समर्थन जाहीर केल्यानंतर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची काही एक गरज नसताना बिन बुलाये मेहमान प्रमाणे समर्थन जाहीर करून शरद पवारांनी राजकीय क्षेत्रात स्वतःचे हसे करून घेतले आहे. या ऐवजी तिथे राष्ट्रवादी काँग्रेसला ताठ मानेने विरोधक म्हणून सदनात बसता आले असते. ही बाब राजकारणातील चाणक्य म्हणून स्वतःच्या पक्षात ओळख असलेल्या शरद पवारांना कसे उमगले नाही. असा खोचक टोलाही शफिक भाऊंनी लगावला आहे.
लोकशाही असलेल्या देशात विरोधक नसणे ही गंभीर बाब
२०१४ पासून स्पष्ट बहुमताने केंद्रात सत्तेत आलेला भाजप अगदी नियोजनबद्धरित्या सदनातून मग ते कोणत्याही राज्यातील विधान भवन असो की देशाचे संसद भवन प्रत्येक सदनातून विरोधी पक्ष संपवित चालला आहे. भाजपची ही नीती देशाच्या सुदृढ लोकशाहीला मारक आहे आता हे जनतेने लक्षात घ्यावे अन्यथा जगातील सर्वात मोठ्या लोकशाही प्रधान असलेल्या आपल्या भारतात हुकूमशाही अमलात यायला उशीर लागणार नाही असेही शफिक भाऊंनी म्हटले आहे.