प्रदीप खापर्डे, नागभीड तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पोंभूर्णा, दि १२:- आदीअनंत काळापासून स्त्रीने नेहमी समाजाला दिशा दाखवली आहे. मात्र अलीकडच्या काळामध्ये स्त्रीला सन्मानासाठी संघर्ष करावा लागतो आहे. अशात महिलांना समाजात समान आदर मिळवून देत नारी ते नारायणीपर्यंतचा प्रवास आपल्या सर्वांना सिद्ध करायचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
पोंभूर्णा येथील किरण राईस् मिलच्या पटांगणावर आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला संमेलनात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष वनिता कानडे, प्रदेश सचिव सुरेखा लुंगारे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, यशदा ट्रेनर भावना चांभारे, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष अलका आत्राम, पोंभूर्णाच्या नगराध्यक्ष सुलभा पिपरे, मुलच्या माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, आत्मनिर्भरच्या जिल्हाध्यक्ष किरण बुटले, ज्योती बुरांडे, विजयालक्ष्मी डोहे, रेणुका दुधे, अर्चना जीवतोडे, गोदावरी केंद्रे, कल्पना बोरकर, संजय गजपुरे, नामदेव डाहुले, आशिष देवतळे, विवेक बोढे उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार म्हणाले की, महिलांच्या क्रांतीचा शंखनाद चारही दिशांना ऐकू यावा. २७ जून २०१९ रोजीच्या अर्थसंकल्पात निराधारा, परितक्त्या आणि घटस्फोटितांच्या अनुदानात वाढ केली. ६०० वरुन हे अनुदान १ हजार रुपये तर अपत्य असणाऱ्यांसाठी १ हजार २०० रुपये करण्यात आले. या अनुदान वाढीतून राज्यातील अनेक महिलांना आधार मिळाला. आताही या अनुदानात वाढ झाली आहे. आता हे अनुदान १ हजार ५०० रुपये करण्यात आल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.
समाजातील तळागाळातील महिलांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी सर्वांवर आहे, असे सांगत ना. मुनगंटीवार यांनी यासाठी भाजपाच्या महिला आघाडी, भारतीय जनता युवा मोर्चाच्या युवती आघाडीने प्रयत्न करावा. महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. महिलांचे प्रश्न सोडवा म्हणणे अत्यंत सोपे आहे, परंतु त्यासाठी काम करणे बरेचदा अवघड होते. अनेक आव्हानांना त्यावेळी सामोरे जावे लागते. अशा सर्व आव्हानांना तोंड देत आपल्याला काम करावे लागेल असे ठाम मत ना. मुनगंटीवार यांनी मांडले.
समाजात सन्मानाचे मुख्य पात्र नेहमीच स्त्री राहिलेली आहे. परंतु दुर्दैवाने आजच्या स्त्रीला त्रास सहन करावा लागतोय. तिच्यावर अन्याय, अत्याचार होत आहेत असे ना. मुनगंटीवार यांनी खेदाने नमूद करीत सांगितले की, हा अन्याय थांबविण्यासाठी सर्वांना एकत्रितपणे लढा द्यावा लागेल. जेव्हा जेव्हा स्त्रीचा अवमान झाला तेव्हा तेव्हा मोठी क्रांती झाली, याची साक्ष इतिहास देतो. नारीशक्तीच्या सन्मानासाठी विश्वगौरव, देशगौरव पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी जाणीवपूर्वक काम करीत आहेत. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ सारखे उपक्रम त्यांनी यशस्वी करून दाखविले आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत राज्य शासन ‘लेक लाडकी’ योजना राबवित आहे.
नारीशक्तीची सेवा करण्याचे सौभाग्य आपल्याला लाभल्याचा अभिमान वाटतो. १८० दिवसांची पालकत्व रजा आपल्याच मंत्रिपदाच्या काळात सुरू झाल्याचे ना. मुनगंटीवार यांनी नमूद केले. मुलांच्या शिक्षणासाठी ही रजा देण्यात आली आहे. निवृत्ती वेतनातही पुनर्विवाहानंतरचा हक्क कायम ठेवला. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांच्या मानधनातही सरकारने वाढ केल्याचा उल्लेख ना. मुनगंटीवार यांनी अभिमानाने केला. अंगणवाडी सेविकांची पदे भरून महिलांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रपतिपदावर आदिवासी समाजातील द्रौपदी मुर्मू यांच्या निमित्ताने एका महिलेला संधी मिळाली आहे. त्यामुळे महिलांनी निराश होण्याचे काहीच कारण नाही, उलट महिला राज सर्वत्र वाढत असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी गौरवाने प्रतिपादीत केले.
चंद्रपुरात बचत गटाचे कार्य करणाऱ्या महिलांचे मोठे संमेलन लवकरच होणार आहे. या संमेलनाच्या माध्यमातून या महिला आर्थिक समृद्धीच्या महामार्गावर पुढे नेण्याचे कार्य करण्यात येणार असल्याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. महिलांना कोणत्याही क्षेत्रात काम करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. बरेचदा त्यांच्या चारित्र्याबद्दल जाणीवपूर्वक संशयाचे वातावरण तयार करण्यात येते. असे कृत्य करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे असे ठाम मत करीत ना. मुनगंटीवार म्हणाले की अशांना शिक्षा करण्यासाठी प्रसंगी महिलांनीच नाही तर पुरुषांनीही पुढे यावे.