मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- जिल्हातील सुरगाणा तालुक्यातील बिवळ येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे सख्या चुलत दीराने कुऱ्हाडीचे सपासप घाव घालून आपल्याच मोठ्या भावाच्या पत्नीची म्हणजेच भावजयीची निघृण हत्या केली. हत्या केल्या नंतर संशयित आरोपी फरार झाला आहे. रमेश परशराम गावंडे असे आरोपीचं नाव आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार फिर्यादी चंदर गावंडे यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दुपारी अकरा वाजेच्या सुमारास हत्या करण्यात आलेल्या महिला यशोदा लक्ष्मण गावंडे वय 26 वर्ष ही विवाहिता राहत्या घरी स्वयंपाक करत असतांना तेथे संशयित आरोपी सख्खा चुलत दीर रमेश परशराम गावंडे हा हातात कुऱ्हाड घेऊन आला. त्याने यशोदा यांच्या डोक्यावर, मानेवर, मागील बाजूस कुऱ्हाडीचे सपासप चार वार केले. त्यात महिला गंभीर जखमी झाली त्यात तिचा मृत्यू झाला. कुऱ्हाडीचे घाव इतके खोलवर होते की, मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या पुर्णपणे तुटल्याने मोठ्याप्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या हत्याकांडाची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता आरोपीच्या चपला, गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड ताब्यात घेत पंचनामा केला आहे. विवाहितेस एक दोन महिन्याचे अपत्य आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. संशयित आरोपी फरार झाला असून पोलिस निरीक्षक संदीप कोळी कसून तपास करीत आहेत.