युवराज मेश्राम विदर्भ ब्युरो चीफ (नागपुर)
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी म्हणून संप पुकारला आहे. त्यामुळे आरोग्य सेवा पूर्णतः कोलमडली आहे. त्यामुळे रुग्णाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे.
नागपुर येथील शासकीय रुग्णालयातील परिचारिका, तंत्रज्ञ, फार्मासिस्ट व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यानी संपला पाठिंबा दिला. त्यामुळे मेयो, मेडिकलमधील आज नियोजित शेकडीच्या वर शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. रुग्णालयातील प्रत्येक वॉर्डांतील स्थिती तर भयानक होती. सलाइन संपली तरी दुसरी लावण्यास नर्स नव्हत्या. त्यात वरिष्ठ डॉक्टर वॉर्डाकडे दिवसातून एकदाच फिरकत असल्याने संपूर्ण भार निवासी डॉक्टरांवर आला. त्यांना उपचारासोबतच नर्सेस आणि टेक्निशियनचेही काम करावे लागत असल्याने गोंधळ उडाला होता.
जुनी पेन्शनच्या मागणीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा शासकीय स्त्री रुग्णालय, प्रादेशिक मनोरुग्णालय आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालयातील जवळपास 1500 च्या वर परिचारिका संपात सहभागी झाल्या आहेत. रुग्णसेवेचा कणा असलेल्या परिचारिकाच नसल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. त्यात भर म्हणून तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचारीही संपात सहभागी असल्याने शासकीय रुग्णालयात कशीबशी इमर्जन्सी रुग्णसेवा दिली जात आहे. उद्या गुरुवारपासून ही स्थिती आणखी नाजूक होण्याची शक्यता आहे.
रुग्णाचे अतोनात हाल.
या संपाचा सर्वात जास्त हाल रुग्णालयातील रुग्णाचे होत आहे. हा संप असाच सुरू राहिला तर मोठ्या प्रमाणात जीवित हानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.