संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीला घेऊन राज्य सरकारी-निमसरकारी, शिक्षक- शिक्षकेत्तर यासह अन्य विभागांच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन दिवसापासून संपात सहभाग घेतला असून राजुरा येथील तहसील कार्यालय परिसरात संपकर्यानी सभामंडप उभारला आहे. तहसील कार्यालयाच्या परिसरात जुन्या पेंशन सुरू करण्यासंबंधी सरकारचे लक्ष वेधण्याकरिता स्वरचित कविता, गोंधळ, पेन्शन गीत, भजणे म्हणून संपाचा तिसरा दिवस गाजवला. या संपात विविध विभागाच्या सहभागी कर्मचाऱ्यांनी आपल्या स्वरचित कविता, गोंधळ, भजन, मनोगतातुन व्यथा मांडल्या.
सर्वच विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने दि.14 मार्च पासून कामंबंद आंदोलनात सहभागी झालेले आहेत. तहसील कार्यालयाच्या आवारात विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले व शासनाचा निषेध केला.
दिनांक 14 मार्च पासून राज्यात कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. संपाच्या तिसऱ्या दिवशीही तालुक्यातील सरकारी-निमसरकारी, आरोग्य, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, तहसील, पंचायत समिती, वनविभाग सह अन्य विभागाचे शेकडो कर्मचारी संपात सहभागी झाले. राज्यव्यापी संपाने शासकीय कार्यालयांत शुकशुकाट आहे.यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. शिक्षकही मोठ्या प्रमाणावर संपात सहभागी असल्यामुळे शाळा ओसाड पडलेल्या आहेत.जुन्या पेन्शनसाठी मोर्चा, निदर्शन आणि ठिय्या आंदोलनाने शासनाचे लक्ष वेधून घेतले जात आहे. रॅलीत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, पुरोगामी शिक्षक समिती, आरोग्य विभाग संघटना, महसूल विभाग, वनविभाग, सामाजिक वनिकरण विभाग, कृषी, पशुवैद्यकीय विभाग,भूमीअभिलेख विभाग, सुधीर झाडे, संतोष कुकडे, दयानंद पवार, अमोल बदखल, पंकज गावडे, राजु डाहुले, संजय चिडे, संदीप कोंडेकर, श्रीकृष्ण गोरे, मोहनदास मेश्राम, प्रदीप पायघन, देविदास कुईटे , दिपक भोपळे, श्रीकांत भोयर, बादल बेले, रुपेश चिडे, महिला, पुरुष, जेष्ठासह शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते.