सावनेर नगर परिषद मध्ये 20000/- रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक, 15 दिवसाच्या आत मध्ये सावनेर नगरपरिषद कार्यालयात दुसरी कारवाई
अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर, 23 मार्च:- येथून एक खळबजनक घटना समोर आली आहे. येथील नगरपरिषद कार्यालय सावनेर येथील नितीन विनायकराव मदनकर, वय 41 वर्ष, शहर स्तरीय तांत्रिक अभियंता व विलास देवरावजी राऊत, वय 38 वर्ष, खाजगी व्यक्ती यांनी 20000 रुपयाची लाच रक्कम स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूरच्या पथकाने रंगेहात पकडले. 15 दिवसाच्या आत मध्ये सावनेर नगर परिषद कार्यालयात दुसरी कारवाई करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांना यश मिळाल्याने नगरपरिषद कार्यालयात घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाले असून तिसऱ्या टप्प्यातील चेक काढून देण्याकरिता नगरपरिषद कार्यालय सावनेर येथील अभियंता श्री.नितीन विनायकराव मदनकर यांनी तक्रारदार यांना 25000/- रुपये लाचेची मागणी केली.तक्रारदार यांना लाचेची रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर येथे प्रत्यक्ष येऊन तक्रार नोंदविली.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा मते ला.प्र.वि.नागपूर यांनी तक्रारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता पडताळणी दरम्यान नगरपरिषद कार्यालय सावनेर येथील अभियंता नितीन विनायकराव मदनकर यांनी तक्रारदार यांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या तिसऱ्या टप्प्यातील चेक काढून देण्याकरिता 25000/- रुपयाची लाच मागणी करून तडजोडीअंती 20000/- रुपये कार्यालयाच्या आवारात विलास देवरावजी राऊत खाजगी व्यक्ती यांच्या मार्फत पंचासमक्ष स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आले. नितीन मदनकर यांनी आपले लोकसेवक पदाच्या दुरुपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायदा करिता लाच रकमेची मागणी करून 23 मार्चला स्वतः स्वीकारल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सावनेर, जिल्हा नागपूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहेत.
सदरची कारवाई राहुल माकणीकर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर, मधुकर गीते अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती वर्षा मते, पोलीस निरीक्षक आशिष चौधरी, नापोशी अनिल बहिरे, मपोशी हर्षलता भरडकर सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांनी केलेली आहे.