✒️प्रशांत जगताप संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांना न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षा, आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार विरोधात हिंगणघाट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे जोरदार आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये कर्नाटकच्या कोलार येथे आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून टीका केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. या विरोधात गुजरातमधील भाजपाचे माजी आमदार तथा माजी मंत्री पुरनेश मोदी यांनी राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. त्या प्रकरणी सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्या निर्णयानंतर देशभरात काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. त्यात हिंगणघाट येथील डॉ. आंबेडकर चौकात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना प्रक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले असून, पंतप्रधान मोदीं विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी महविकास आघाडीचे नेते म्हणाले की, राहुल गांधी यांनी २०१९ च्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती, त्यावर आज न्यायालयाने निर्णय दिला असून, राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. राजकीय जीवनात एकमेकांवरील टीका टिपणी हसतखेळत स्वीकारली पाहिजे, पण हे भाजपा नेत्यांना मान्य नसल्याचे दिसून येत आहे. आमच्या विरोधात काही विधाने केलीत तर तुम्ही जेलमध्ये जाणार, हेच आजच्या निर्णयामधून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निषेध व्यक्त करीत आहोत. आज देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आली आहे. आज प्रत्येक विरोध करणाऱ्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. त्यामुळे आम्ही अधिक ताकदीने रस्त्यावर उतरून सरकारविरोधात लढा उभारणार, असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुर्दाबाद… केंद्र सरकारचा धिक्कार असो… संविधान बचाव देश बचाव अशा घोषणेने आंदोलन परिसर दणाणून गेला होता. यावेळी महाविकास आघाडीचे पांढरी कापसे, अनिल जवादे, प्रविण उपासे, ज्वलंत मून, शेख सरफु, अमित चापले, इकबाल पहिलवान, सतिश धोबे, डॉ. उमेश तुळसकर, राजु खुपसरे, सतीश ढोमणे, धनजय, बकाने, संगीता कडू, माधुरी खडसे, सैय्यद मेराज सह शेकडो महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.