डॅनियल अंथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी, ता. २४:- मुलावर चांगले संस्कार करण्याची प्रत्येक माता-पितांची धडपड असते. त्याकरिता वाटेल ते कष्ट करण्याची त्यांची तयारी देखील असते. आपला मुलगा शिकून मोठा ऑफिसर व्हावा अशी मनोमन इच्छा प्रत्येक आई-वडिलांचे असते. परंतु पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाच्या जाळ्यात एक बाप सापडलाय आहे. तो आपल्या अल्पवयीन मुलांना चोरी करण्याचे धडे देऊन त्यांच्याकडून चोरी करून घेत होता. सध्या चोराचा बाप पोलिसांच्या ताब्यात आहे. सुरेश दगडू जगताप वय ३८ वर्ष, रा.कुसगाव, जाधव यांच्या फार्म हाऊस मध्ये ता. मावळ, जि. पुणे असे अटक केलेल्या अवलिया पित्याचे नाव आहे या पित्याच्या ताब्यातून एकूण ०८ चोरीचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आहेत पथकाने ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे यांनी गुन्हे शाखेकडील अधिकारी व अमंलदार यांना मालमता चोरीच्या गुन्ह्यास प्रतिबंध करून गुन्हे उघडीस आण्याबद्दल आदेश दिल्याप्रमाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील उघडकीस न आलेल्या मालमत्तेच्या गुन्ह्याच्या घडलेल्या घटनेचा आढावा घेवून या गुन्ह्याचा आढावा घेऊन पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना केल्या.
वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे पथकातील सहाय्य पोलीस निरीक्षक उद्धव खाडे हे स्टाफ सह हिंजवडी व वाकड भागात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार कानगुडे, नलगे व पोलीस नाईक गिरी गोसावी यांना मिळालेले माहितीवरून इसम सुरेश जगताप याला वाकड स्मशान भूमी येथून ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एकूण ६५ हजार रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीचे ०८ मोबाईल फोन मिळाले या मोबाईल बाबत जगताप यांच्याकडे विचारणा केली असता त्याने त्याचा अल्पवयीन मुलगा आणि भाचा यांच्या करवी हिंजवडी भागातून हे मोबाईल फोन चोरी केले असल्याचे पोलिसांना सांगितले .पथकाने हिंजवडी पोलीस ठाणे येथे या गुन्ह्याबाबत खात्री केली असता याबाबत गुन्हा दाखल असल्याची माहिती पथकाकडे प्राप्त झाली. या गुन्हयाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह आयुक्त मनोज कुमार लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे,सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी आणि विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, सहाय्य पोलीस उप -निरीक्षक अशोक दुधवणे, अमर राऊत, पोलीस अमंलदार सुनील कानगुडे, किरण काटकर, विजय नलगे, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे,गणेश गिरी गोसावी, सुधीर डोळस, प्रदीप गायकवाड, प्रदीप गुट्टे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.