सागर शिंदे, वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन वाशिम:- विद्युत रोषणाई, ढोलताशांचा गजर, आकाशात फडकणारे भगवे झेंडे, भक्तीत भारावलेले भक्तगण, आणि प्रभू श्रीरामाचा जयघोष अश्या भक्तिमय वातावरणात वाशिम जिल्ह्यातील मालेगांव शहरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी रामनवमी उत्सव समिती तर्फे भव्य शोभायात्रा तसेच पालखीचे आयोजन करण्यात आले होते. ट्रॅक्टर मध्ये प्रभू श्रीरामाची मूर्ती ठेवून आकर्षक सजावट करून ढोलताशांच्या गजरात गांधी नगर मधून यात्रेला सुरवात झाली. असंख्य श्रीराम भक्तांनी भव्य शोभायात्रेत सहभागी होऊन जय श्रीराम, श्रीरामचंद्र की जय अशा घोषणा देत संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता. हजारो रामभक्तांच्या आलोट गर्दीत मालेगांव शहरात रामनवमी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.