सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, वाशिम येथे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी (जि. प.) व जिल्हा जात पडताळणी समिती, वाशिम यांच्या वतीने आज 5 एप्रिल रोजी सामाजिक न्याय समता पर्वानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती, मिनी ट्रॅक्टर लाभार्थी व कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण लाभार्थी यांना प्रातिनिधीकस्तरावर साहित्य वाटप करुन योजनांची माहिती देण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, प्रा. यु. एस. जमदाडे होते. अध्यक्ष म्हणून श्री. रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. किशोर वाहाणे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त शाहीर संतोष खडसे, प्रज्ञानंद भगत व कार्यालय अधिक्षक श्रीमती किरण तायडे यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रस्ताविकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त शाहीर संतोष खडसे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिळणाऱ्या मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभीमान व सबळीकरण योजना, रमाई घरकुल योजना व विदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना अशा विविध लोककल्याणकारी योजनेची माहिती दिली.
श्री. एस. बी. मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अटी व शर्ती, पात्रता, जोडावयाची कागदपत्रे, मिळणारे विविध भत्ते याबाबतची माहिती देवून योजनेबाबत काही अडचणी असल्यास कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेस पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप केले.
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या बचत गटांना मिळणाऱ्या मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांचा पुरवठा करणे या योजनेअंतर्गत एकूण 22 पात्र लाभार्थ्यांपैकी मंगरुळपीर तालुक्यातील शहापूर येथी बोधीसत्व महीला बचत गट, कारंजा येथील लुंबिनीवन स्वयं सहा. महीला बचत गट, जांब (अढाव) येथील महात्मा फुले शेतकरी स्वयं सहा. बचत गट, मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील धम्मदिप स्वयं सहा. शेतकरी बचत गट, मांडवा येथील माता रमाई महीला / पुरुष गट, या पाच बचतगटांना प्रातिनिधीक स्वरुपात पुष्पगुच्छ देण्यात आले. जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि. प. कार्यालयाच्या कार्यालय अधिक्षक कु. ईश्वरकर यांनी जिल्हा परिषद समाज कल्याण मार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदानीत वसतीगृह योजना, मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजना, दिव्यांग व्यक्तींसाठी योजना, बीज भांडवल योजना, आंतरजातीय विवाह योजना अशा विविध योजनांची माहिती देवून जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच काही शंका किंवा अडचणी असल्यास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे देखील आवाहन करणत आले.
या कार्यक्रमात वृद्ध कलावंत परिवर्तन कला महासंघाचे अध्यक्ष शेषराव मेश्राम व शाहीर रतन हाडे यांनी समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती जनतेमध्ये पोहचविण्याचे व प्रबोधनाचे काम करत असल्याचे सांगितले. कलावंतांना मिळणारे मानधन खूप कमी असल्याचे सांगून मानधनात वाढ व काही अटी शिथील करण्याबाबतची मागणी त्यांनी केली. त्यांच्या सोबत वृद्ध कलावंत मदन भगत, श्रीराम गवई, मधुकर भगत, निर्मलाबाई रोही, सुमनबाई ईढोळे व सिद्धार्थ भगत उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षस्थानावरुन प्रा. वाहाणे यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या लोककल्याणकारी योजनांची तळागळातील वंचित घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी योजनांची व्याप्ती वाढवून काही अटी व शर्तीमध्ये शिथीलता आणण्याची आवश्यकता विषद केली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. गजानन हिवसे यांनी केले. आभार रितेश अल्लाट यांनी मानले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी, वृद्ध कलावंत, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी व कर्मचारी, शासकीय वसतीगृहातील गृहपाल व विद्यार्थी, शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग व्यवस्थापक सर्व ब्रिक्स प्रा. लि. व क्रीस्टल कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते.