✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- बनावट नोटा चलन करणाऱ्या चौघांना वर्धा पोलिसांनी अटक केली होती. बनावट नोटा प्रकरणांत पोलिसांच्या विविध पथकांनी तपास करीत अंकुश कुमार मनोज कुमार रा. बुलंदशहर उत्तरप्रदेश याला दिल्लीतून अटक केली. अखेर अंकुशने बनावट नोटा इंदोर इथून आणल्याचे समोर येताच पोलिसांनी थेट इंदोर गाठून बनावट नोटांचा मास्टर माईंड ओमप्रकाश भगवान लालवानी वय २३ वर्ष याला अटक केली. बनावट नोटा चलन प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ६ आरोपींना बेड्या ठोकून टोळीचा पर्दाफाश केला.
काही तरुण बनावट नोटा चलणात आणत असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी दिनेश तुमाने यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी निखील लोणारे, स्वप्नील उमाटे, प्रितम हिवरे, साहील साखरकर यांना १७ मार्च रोजी अटक केली होती. त्यांच्याकडून तब्बल ५०० रुपयांच्या ९४ हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यांनी दिल्ली येथील राज नामक व्यक्तीने ५० हजार रुपयांच्या बदल्यात १ लाख २० हजारांच्या बनावट नोटा दिल्याचे सांगितले. पोलिसांनी तत्काळ शोध घेऊन दिल्ली येथून अंकुश कुमार मनोज कुमार वय २० वर्ष याला २३ मार्च रोजी अटक केली. त्याच्याकडून १ लाख १० हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या. पोलीस कोठडी दरम्यान त्याने बनावट नोटा ओमप्रकाश भगवान लालवानी रा. इंदोर याने पुरविल्याची माहिती दिली. पोलिसांनी इंदोर इथे जात मास्टरमाईंड ओमप्रकाश याला अटक केली.
वर्ध्यातील ४ आरोपींची दिल्ली इथल्या अंकुश कुमार याच्याशी इन्स्टाग्रामवर दिसलेल्या एका ‘फेक करन्सी्’ पेजवरून ओळख झाली. बनावट नोटांबाबतची माहिती चारही आरोपींनी त्याच्याकडून घेतली. त्यानंतर ते अँप बंद केले. दिल्लीतील अंकुशसोबत वर्ध्यातील ४ जणांनी मोबाईलवर संभाषण केले. त्यांना बनावट नोटा पुरविल्या. तसेच दिल्ली येथील आरोपी अंकुश याची इंदोर येथील मुख्य सुत्रधार असलेला ओमप्रकाश याच्याशी देखील इन्स्टाग्रामवरूनच ओळख झाली होती. हा सर्व तपास करताना पोलिसांना मोठ्या अडचणी आल्या. मात्र, पोलिसांनी सर्व आरोपींना अटक करुन टोळीचा पर्दाफाश केला.
पोलिसांनी इंदोर इथे जात बनावट नोटा छपाई साठी वापरलेला लॅपटॉप, दोन कलर प्रिंटर, ५,५०० रुपयांच्या बनावट नोटा तसेच ५०० रुपयांच्या ४२८ बनावट नोटा २ लाख १४ हजार रुपये जप्त केले. तसेच दिल्ली येथील आरोपीकडून १ लाख १० हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहे. बनावट नोटा या इतर देशांतून येत असल्याने तसेच नोटा तयार करणाऱ्या कागदाची आरोपी ओमप्रकाश याने ‘टेलिग्राम’ अँप डाऊनलोड करुन त्या ग्रुपवर मेसेज टाकून मागणी केल्याचे निष्पन्न झाले. मागील तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. नोटा बनविण्यासाठी लागणारा कागद हा इतर देशातून येत असल्याचा संशय असल्याने तसेच इतर देशांसोबत याचे धागेदोरे असल्याने हा तपास एनआयए तसेच एटीएसकडे सोपविणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी दिली आहे.