26 एप्रिलपासून हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाची सोनोग्राफी मशीन सुरू होणार
मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑगस्ट 2020 पासून बंद असलेली सोनोग्राफी मशीन पूर्ववत येत्या 26 एप्रिल पासून सुरू करून लेप्रोस्कोपी कुटुंब नियोजनाचे शिबीर नियमित सुरु करण्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, तहसीलदार यांच्या उपस्थितीत लेखी लिहून दिल्यानंतर सोमवार दिनांक 24 एप्रिल ला दुपारी 1 वाजता गजू कुबडे यांच्या प्रायश्चित आंदोलनाची यशस्वी सांगता झाली.
हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य विषयक कोणत्याही सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने सामान्य नागरिकांची मोठीच कुचंबना होत असल्याने या विरोधात सोमवार, दि 24 एप्रिलला रुग्णमित्र गजू कुबडे यांनी एक दिवसाचे रणरणत्या उन्हात अनवाणी पायांनी उपविभागीय कार्यालयासमोर दुपारी 11 वाजता सुरू केले. या आंदोलनाची तातडीने दखल उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले यांनी घेतली. त्यांनी परवापासूनच उपजिल्हा रुग्णालयाच्या वैधकीय अधिकाऱ्यांशी सातत्याने चर्चा करून याबाबत योग्य तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा सुरू केला.
सोमवार दुपारी 11 वाजता 45 डिग्री तापमानात गजू कुबडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बाहेर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून आपल्या अनोख्या प्रायश्चित्त आंदोलनाची सुरुवात केली. उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या अव्यवस्थेच्या विरोधात फलक हातात झळकवीत त्यांनी शेकडो नागरिक व प्रहार कार्यकर्त्याच्या उपस्थितीत आंदोलन सुरू असताना शेकडो नागरिकांनी भेट देऊन आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी तहसीलदार सतीश मासाळ व अन्न व पूरवठा अधिकारी सुहास टोंग यांनी आंदोलन स्थळी येऊन गजू कुबडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मागणी मान्य असून आंदोलन मागे घेण्याची विंनती केली. परंतु लेखी ठोस आश्वासन मिळे पर्यंत मागे न घेण्याचा निर्धार कुबडे यांनी व्यक्त केल्याने शासकीय पातळीवरून वेगाने हलचाली करण्यात आल्या. वैधकीय अधिकारी डॉ चाचरकर यांनी स्वतः आंदोलन स्थळी येत लेखी पत्र गजू कुबडे यांच्या सुपूर्द केले. या लेखी शासकीय पत्रानुसार,बुधवार दि २६ एप्रिल पासून उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या सोनोग्राफी मशीन द्वारे गर्भवती महिलांचे नियमित सोनोग्राफी रुग्णालयात कार्यरत स्त्री रोग तज्ञा डॉ. मीनाक्षी वावरे ह्या करतील व इतर येणाऱ्या अन्य रुग्णासाठी उपजिल्हा रुग्णालयाने येथील खासगी महिला चिकित्सक डॉ. सीमा मानधनिया यांच्याशी सामंजस्य करारनामा 100 रू स्टँप पेपरवर करून घेतला आहे. करारनाम्यात उपजिल्हा रुग्णालय येथे येणाऱ्या रुग्णांना सोनोग्राफी साठी त्याच्या खासगी रुग्णालयात पाठविण्याचे ठरविले होते. मात्र रुग्ण मित्र गजू कुबडे यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे येणाऱ्या सर्व रुग्णांना सोनोग्राफी रुग्ण बाहेर न पाठविता रुग्णालयातच करावे याच्यासाठी आग्रह धरला कारण उपजिल्हा रुग्णालय ते खासगी रुग्णालयाचे अंतर 1 की मी अंतर असल्याने रुग्णांना येण्या जाण्यासाठी आर्थिक भुरदण्ड सहन करावा लागणार होता व वेळेचाही अपव्यय होत होता. शेवटी अधिकाऱ्यांनी गजू कुबडे यांची ही मागणी योग्य असल्याचे सांगून ते मान्य करून उपजिल्हा रुग्णालय येथेच सर्व रुग्णांची दैनिक सोनोग्राफी खाजगी चिकित्सक डॉ सीमा मानधनीया उपजिल्हा रुग्णालयात जाऊन करतील ही मागणी मान्य केली.
या लेखी पत्रानंतर गजू कुबडे यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी उपस्थित शेकडो नागरिकांनी फुलांच्या पाकळ्यांची उधळण कुबडे यांच्यावर करून त्यांचे अभिनदन व स्वागत केले. सतत अडीच तास ४५ डिग्री तापमानात अनवाणी पायाने डांबर रस्त्यावर उभे राहिल्याने गजू कुबडे यांच्या पाय चांगलेच सोलून निघाले. या आंदोलनस्थळी प्रहार कार्यकर्ते अतुल जाधव, अजय लढी, वन्यजीवरक्षक राकेश झाडे, सूरज कुबडे, राजू बोभाटे, अजय खेडेकर, राहुल पाटील, धीरज नन्दरे,शेखर जामुनकर, सुधीर मोरेवार अमजद पठाण, सागर आत्राम, रितेश गुडधे, मोहन पेरकुंडे, राजेश पंपनवार, रोशन बरबटकर, मुन्ना ठाकूर मयूर पुसदेकर, अजय खेडेकर, राहुल पाटील, धीरज नंदरे, सागर आत्राम, रुपेश गुडदे, प्रकाश म्हणणे, दीपक पावडे, गजानन जरीलेईश्वर, उठाणे विकी ठाक, मेघशाम कुकडे, संदीप जुमडे, विनोद ठाकरे,सौरभ ढोबे, राहुल चौधरी, गजानन कुंभारे, आकाश तळवेकर, प्रकाश झिलपिले, अशोक केवटे, पवन वाघमारे, अमोल रामगुंडे, अमोल वाघमारे सह अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येत आंदोलनात सहभागी झाले होते.