✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- सर्वसामान्य गरीब, गरजू रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ही योजना सुरु केली आहे. याअंतर्गत महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त नालवाडी, वर्धा येथे सुरु करण्यात आलेल्या या दवाखान्याचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रा.ज.पराडकर, सरपंच प्रतिभा माऊसकर, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी अधिकारी डॉ.रेवतकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.माधुरी दिघेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ.सुप्रिया गोमासे, डॉ.गणेश जवादे, डॉ.जयश्री गाठे, डॉ.प्रणित पाटील, जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक अधिकारी अन्नपूर्णा ढोबळे, मुख्य औषध निर्माण अधिकारी सोज्वळ उघडे, ग्रामपंचायत सदस्य किशोर कुहीकार आदी उपस्थित होते.
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कामकाजाची वेळ तसेच दुरवरचे अंतर या कारणाने अनेक नागरिक आरोग्य सेवांपासून वंचित राहतात. अशा नागरिकांना आरोग्य सेवांचा लाभ घेता यावा, यासाठी राज्य शासनाच्यावतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात कार्यान्वित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 317 दवाखान्याचे कार्य सुरु झाले आहे.
आपला दवाखाना नागसेन नगर, नालवाडी, वर्धा येथे सुरु करण्यात आला असून त्याचा डिजीटल उद्घाटन सोहळा महाराष्ट्रदिनी पार पडला. यावेळी घेतलेल्या आरोग्य शिबिरात नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सदर आरोग्य शिबिरात मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी करण्यात आली. नागरिकांनी स्त्रीरोगतज्ञ, अस्थिरोगतज्ञ शिवाय नेत्ररोगतज्ञ यांच्यामार्फत आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
या दवाखानामार्फत दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत बाह्यरुग्ण सेवा देण्यात येणार आहे. तसेच मोफत औषधोपचार, मोफत तपासणी, टेलीकन्सल्टेशन, गर्भवती महिलांची तपासणी, लसीकरण तसेच महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यक्तेनुसार विशेषज्ञ संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर सेवा सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत उपलब्ध करून देण्यात येतील, असे यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रा.ज.पराडकर यांनी सांगितले.