सागर शिंदे, वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- वाशिम नगर परिषदेकडून शहरात कचरा संकलनासाठी असलेल्या घंटागाड्या बंदावस्थेत उभ्या करून, शहरातील कचरा संकलनाकरिता 21 ट्रॅक्टर सुरू केले. मात्र याप्रकारातून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करून, थेट राज्याच्या राजधानीतून मुंबई येथील आझाद मैदानावर वाशिम नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात आपचे राम पाटील डोरले यांनी सोमवार दि. 15 मे 2023 पासून आमरण उपोषणाच्या लढ्याला सुरुवात केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ बडतर्फी सह गुन्हे दाखल करावेत, व त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू केले आहे.
राम पाटील डोरले यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती अशी की, वाशिम नगर परिषदेकडून शहरातील कचरा संकलीत करण्याकरिता 21 जुलै 2022 ला 17 घंटागाड्या खरेदी करण्यात आल्या होत्या. मात्र, या हक्काच्या घंटागाड्या बंदावस्थेत उभ्या करून, तत्कालीन मुख्याधिकारी दीपक मोरे व अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी कंत्राटदास सुरेश कदम यांना 21 ट्रॅक्टरद्वारे कचरा संकलीत करण्याचे कंत्राट दिले. या कंत्राटातूनच वाशिम शहरातील नागरिकांच्या हक्काच्या करातून दिल्या जाणाऱ्या पैशात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्या जात आहे. त्यामुळे आपचे वाशिम जिल्हाध्यक्ष राम पाटील डोरले यांनी थेट मुंबई येथील आझाद मैदानावरून वाशिम नगर परिषदेतील भ्रष्टाचारा विरुद्ध आवाज उठवत बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
शहरात कचरा संकलनासाठी एकूण 21 ट्रॅक्टर असून, दिवसाला 3 फेऱ्या अशा 13 दिवसात 819 फेऱ्या होतात. या कामापोटी 9 लाख 96 हजार 461 रुपये देयक काढले जाते. त्यामुळे पहिला टप्पा 13 व दुसरा टप्पा 13 अशा एकूण महिन्यातील 30 दिवसाचा कचरा संकलनावर होणारा खर्च हा 22 लाख 99 हजार 525 रुपये एवढा झाला आहे. दि. 12 जुलै 2022 ते दि. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत एकूण 1 कोटी 09 लाख 61 हजार रुपये देयकापोटी काढले आहेत. जर 10 लाख रुपयांच्या वर कुठल्याही कामाचे बिल निघत असेल तर त्याकरिता ई-टेंडर काढावे लागते. मात्र वाशिम नगर परिषदेत या बाबीला पूर्णतः फाटा देवून अधिकारी, कर्मचारी व कंत्राटदार भ्रष्टाचार करीत आहेत.
21 पैकी 5 ट्रॅक्टर कागदोपत्रीच कार्यरत
वाशिम नगर परिषदेकडून शहरात 21 ट्रॅक्टरचा करार हा महिन्यातील 13 दिवस कचरा संकलन करण्याचा होता. प्रत्यक्षात 16 ट्रॅक्टर शहरामध्ये कचरा संकलनाचे काम करीत असून, 5 ट्रॅक्टर हे केवळ कागदोपत्रीच असून जे कुठल्याही प्रकारचे काम करीत नाहीत. मात्र बिले या सर्व 21 ही ट्रॅक्टरची काढल्या जात असून, आत्तापर्यंत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार या कामातून केल्याचे दिसून येत आहे.
मुंबईतून प्रथमच वाशिम नगर परिषदेच्या भ्रष्टाचारा विरोधात आंदोलन.
वैयक्तीक स्तरावरील आपल्या न्याय-हक्कांसाठी अनेकांनी मुंबई येथील आझाद मैदानावर उपोषण केले असेल. मात्र, वाशिम नगर परिषदेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेविरोधातील भ्रष्टाचारा विरोधात प्रथमच आवाज उठवून आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे या उपोषणाची वाशिम शहरातच नव्हे तर संपूर्ण राजकीय, प्रशासकीय वर्तुळात देखील चर्चा होत आहे. त्यामुळे या आमरण उपोषणाला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे.
निविदा करारातील काही अटी आक्षेपहार्य
वाशिम शहरातील कचरा संकलीत करण्याकरिता जी निविदा प्रक्रिया राबविली. या निविदा प्रक्रियेच्या करारात तत्कालीन मुख्याधिकारी दीपक मोरे यांनी काही अटींचे अधिकार पूर्णपणे स्वतःकडे राखून ठेवले. म्हणजेच कुठल्याही परिस्थितीत केवळ आपल्या मर्जीतील व्यक्तिलाच हे कंत्राट मिळायला हवे, एवढ्याच उद्देशापोटी टाकलेल्या ह्या अटी देखील या प्रकरणाची गंभीरता लक्षात आणून देतात.
वाशिम नगर परिषदेतील भ्रष्टाचाराविरोधात मी वाशिम नगर परिषद, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त स्तरावर अनेकवेळा निवेदने, आंदोलने केली. मात्र, या प्रकरणातील दोषींवर हवी त्या प्रमाणात कुठलीच कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच काही वरिष्ठ अधिकारी देखील त्यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे मी आता थेट मुंबई येथील आझाद मैदानातूनच लढा उभारला असून, जो पर्यंत न्याय मिळत नाही, मी केलेल्या मागण्यांवर ठोस कार्यवाही होत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहणार आहे. राम पाटील डोरले, आप जिल्हाध्यक्ष वाशिम
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348