विश्वास त्रिभुवन अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अस्तगाव:- आपल्याला रोगापासून मुक्त राहायचे असेल तर उत्तम शरीर स्वास्थ्यासाठी दररोज योगासने करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन योग शिक्षक विलास वाळेकर यांनी केले. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने आयोजित न्यू इंग्लिश स्कूल अस्तगाव विद्यालयात योग प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.
सध्याच्या युगात मोबाईल आणि टीव्ही मध्ये मग्न असणारी पिढी ही वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना बळी पडत आहे. कारण त्यांच्यामध्ये व्यायामाचा व शारीरिक हालचालींचा अभाव दिसून येत आहे. आरोग्यासाठी संतुलित आहार आणि योग्य व्यायाम या दोन गोष्टींची आवश्यकता असते आणि म्हणून आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज किमान अर्धा तास व्यायाम करावा अशा प्रकारचे आवाहन विलास वाळेकर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी त्यांनी पाठीवरील, पोटावरील, उभी, बसून अशा वेगवेगळ्या आसनांचे त्याचबरोबर सूर्यनमस्काराचे उत्तम प्रात्यक्षिक त्यांनी केले. विद्यालयातील सुमारे 650 विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनी देखील या योग प्रशिक्षणात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत बालाजी फरसाणचे प्रो. प्रा. संजय बाबर तसेच माजी सैनिक भानुदास गाडेकर यांनीदेखील विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या योगासनांची प्रात्यक्षिके दाखविली. विद्यालयाच्या वतीने प्रभारी मुख्याध्यापक प्रमोद तोरणे यांनी या सर्व मार्गदर्शकांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी मोलाचे परिश्रम घेतले. सूत्रसंचालन उपशिक्षक संतोष कदम यांनी केले तर आभार किरण आंबेकर यांनी मानले.

