✍️ लेखिका: सरिता सातारडे, रा. नागपूर साहित्यिक व विचारवंत
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन विशेष लेख:- धर्मनिरपेक्षता हा आपल्या भारताच्या राज्यघटनेचा एक मूलभूत आधारस्तंभ आहे. घटनेने सर्व नागरिकांना समान स्वातंत्र्य आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. आपण सर्व एकाच देशाचे नागरिक आहोत असे जेव्हा मानतो तेव्हा तो देश खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष असतो. त्या देशात धार्मिक, जातीवाचक, भाषेवर आणि प्रदेशावर आधारित किंवा अशाप्रकारची कुठलीही ओळख दुय्यम ठरते. म्हणूनच अशा धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाऐवजी जेव्हा आपल्या देशात प्रसार माध्यमांद्वारे किंवा देशातील राज्यकर्त्यांद्वारे धार्मिक राष्ट्रवाद शिकविल्या जातो तेव्हा देश जातीयतेच्या, धर्माच्या अग्नीकुंडात जळण्यास सज्ज होत आहे की काय अशी भीती साहजिकच लोकांमध्ये निर्माण होते.
सध्या आपल्या देशातील वातावरण विध्वंसनाच्या मार्गाकडे वळलेले दिसत आहे. आपल्या देशाचा एक हिस्सा असणारे ३०,३५ लाख लोकसंख्या असलेले मनीपूर राज्य सध्या आगीमध्ये जळत आहे आणि देशातील प्रस्थापित मिडिया जणू आपला देश किती सूजलाम् सुफलाम आहे हे भासवित आहे. आपल्या देशात जणू प्रेमाचे नंदनवन फुललेले आहे असे भासविल्या जात आहे. दृश्यम् फिल्मचा इफेक्ट जणू लोकांच्या मनावर कोरण्याचा प्रयत्न इथे होत आहे. पण प्रत्यक्ष धरातलावरील दृष्य त्राहिमाम करणारे आहे.
मणिपूर मधील कुकी आणि मैतेई समुदायामध्ये आरक्षणावरून ३ में २०२३ पासून हिंसाचार सुरू आहे. मणिपूरमधील ख्रिश्चन संस्थांनी म्हटले आहे की, मणिपूर मधील ख्रिश्चन धर्मिय कुकी आणि नागा समुदायांच्या किमान १२० चर्च जाळण्यात आल्या आहेत. अंदाजे १०० हून जास्त लोकं मृत झालेले आहेत. २० हजारांहून अधिक घरे नष्ट झाली आहेत आणि ५० हजारांहून अधिक लोकं विस्थापित झाले आहेत. मैतेई, नागा आणि कुकी या आदिवासीबहुल राज्यातील संघर्ष पराकोटीला वाढलेला असतांना आमच्या देशातील प्रधानमंत्री यावर अवाक्षर ही बोलत नाहीत आणि “मौनं सर्वार्थ साधनम” या उक्तीचे तंतोतंत पालन करतात. ‘मन की बात’ च्या 101 एपीसोड मध्ये अनावश्यक विषयावर बोलणारे प्रधानमंत्री मणिपूर बद्दल, देशातील महिला पहिलवानाबद्दल एका शब्दानेही बोलायला तयार नाहीत. यावर पूर्ण देश स्तब्ध आहे.
रूस आणि युक्रेन चे युध्द एका फोनकाॅल ने थांबविण्याच्या बतावण्या करणारे आमचे प्रधानमंत्री. (प्रस्थापित भांड मिडियावर अशाच बतावण्या करण्यात आल्या होत्या.) महिला पहिलवानांसोबत झालेल्या अत्याचारावरही आमचे प्रधानमंत्री एका शब्दानेही बोलले नाहीत याऊलट बीजेपी मंत्री ब्रीजभूषण शरण सिंह निगरगट्टपणे आपले शक्तीप्रदर्शन करतो आणि आपले धनबल, बाहूबल दाखवून देशातील नैतिकतेला फाट्यावर मारत अहंकाराच्या दर्पाने चूर होतो तरीही आमचे प्रधानमंत्री एकदम चूप..जसे काही घडलेच नाही या आर्विभावात अमेरिका वारीसाठी रवाना झालेत आणि देशातील प्रस्थापित मिडिया मोदीमहाम्याचे वर्णन करण्यास कटीबध्द झालेली दिसते. देशात घडणारे दृष्य काय? आणि प्रस्थापित गोदी मिडिया आम्हाला दाखविते काय? यावरून तरी भारतीय जनतेने स्वतःच्या डोळ्यावरील अंधत्वाचा चष्मा उतरवून सत्य आणि असत्य यातील फरक स्पष्टपणे ओळखावा.
भक्त बनण्यात आता काही हाशिल नाही कारण ही आग वेगाने तूमच्या घरापर्यंत पोहचत आहे. आपला देश किती भयंकराच्या उंबरठ्यावर विराजमान होत आहे हे नांदेड मधील घटनेवरून लक्षात येते. अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादाने जाणारा बळी हे सर्व दृश्य आपणास काय दर्शविते? हिटलरसारख्या लोकांनी प्रचंड राज्ययंत्रनेवर ताबा मिळवला तो फक्त कपट आणि फसवणूक यांच्या द्वारे. ते आणि त्यांचे बगलबच्चे केवळ जोरजबरदस्तीने राज्य करित होते. सर्व जनता विश्वासघात व दहशत याला बळी पडलेली होती. आपल्या भारतातही असे दृष्य आपणास दिसत आहे का? आपण बघतोच आहे आपल्या देशात ‘ऑपरेशन लोटस’ अंतर्गत कशी खेळी खेळल्या गेली? कशाप्रकारे विरोधी पक्षाला संपविण्याचा पध्दतशीर प्रयत्न करण्यात आला? कशाप्रकारे राहूल गांधी या एकाच व्यक्तीला जेरिस आणण्याचे कार्य प्रस्थापित व्यवस्थेने केले? तरीही भारत देश अजूनही संविधानानुसारच चालतो. संविधानाची जी दिशानिर्देशक तत्वे आहेत त्यानुसारच मार्गक्रमण करावे लागते म्हणूनच पूर्णपणे लोकशाही मेलेली नसतांना बोधीवृक्षाच्या छायेतच आपण विसावू शकतो असे मला यावेळी वाटते.
जातीयवादाची, धार्मिकतेची पाळेमुळे यामुळे विरघळून जातील असे मला वाटते. प्रियदर्शी सम्राट अशोकाने निर्मिलेल्या 84 हजार बौध्द स्तूपांचा प्रतिक्रांतीवाद्यांनी नष्ट करण्याचा प्रयत्न केला असला तरी बुध्दाचे आचार आणि विचार त्यांना नष्ट करता आले नाही. आजही संपूर्ण दक्षिणपूर्व एशिया बुध्दांच्या जयजयकाराने दुमदुमत आहे. चीन, जपान, मंगोलिया, तिबेट, नेपाळ, भूतान, श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, इन्डोनेशिया, रशिया, जर्मनी, इंग्लंड आणि अमेरिकाही बुध्द प्रभावा पासून अलिप्त नाहीत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे या देशाचे संविधान निर्माते डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी 21 वर्षे बुध्द तत्वज्ञानाचा अभ्यास करून संपूर्ण जगास फक्त बुध्द तत्वज्ञानाच तारू शकेल असा अतीमहत्वपूर्ण संदेश दिला.
डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना प्रज्ञासूर्य म्हटले जाते. त्यांची बुध्दीमत्ता अत्यंत प्रखर होती. प्रचंड मेहनतीने, जिद्दीने त्यांनी आपली बुध्दीमत्ता तल्लख केली होती. अठरा अठरा तास अभ्यास करून चिंतन, मनन करून त्यांनी स्वतःच्या ज्ञानावर हुकूमत प्राप्त केली होती. बुध्दाचे समग्र तत्वज्ञान एका नव्या आदर्श समाजाच्या निर्मितीसाठीच आहे हे मूलगामी सत्य बाबासाहेबांना कळले म्हणून हा आदर्श समाज प्रत्यक्षात उतरावा यासाठी समाजात समता, स्वातंत्र्य, बंधूता आणि सामाजिक न्याय यावा यासाठी सर्जनशील वातावरण निर्माण करण्यासाठी त्यांनी भारतीय संविधानाची उभारणी केली. विवेकवादी विचारांनी जातीविहीन, वर्ग विहीन अशा प्रबुद्ध माणसांची निर्मिती व्हावी हे बाबासाहेबांचे स्वप्न होते. आणि म्हणूनच त्यांनी मूळ क्रांतीकारी बुध्दाची पुनःस्थापना केली.
रागाचा, द्वेषाचा बिमोड करणारे शस्त्र म्हणजे करूणा. करूणा म्हणजे प्रज्ञानी प्रेम. बुध्द म्हणतो द्वेषाला प्रेमाने जिंका. आज बघतोय आम्ही विरोधी पक्षनेते राहूल गांधी “नफरत के बाजार में मुहोब्बत का दुकान खोलने आया हू” म्हणतात” .. तर हे मुहोब्बत की दुकान म्हणजेच तथागत बुध्दांनी सांगितलेला शांततेचा, करूणेचा मार्ग.(मी काॅग्रेससमर्थक नाही तर सत्याची पक्षधर आहे.) आज देशात जगणे निर्माण करायला निघालेली माणसे कळत नकळत आपलीच मरणे फुलवित आहेत, जेव्हा विध्वंसनाच्या मार्गाने आगेकूच करित आहे. वैचारीक ठिणगी जेव्हा पडत आहे तेव्हा आम्हास नवसंजीवनी देणारा, मनात आशेचा अंकूर पल्लवित करणारा, जगा आणि जगू द्या हे साधेसोपे तत्वज्ञान सांगणारा अहिंसक, रक्तविहीन मार्ग म्हणजेच तथागत बुध्दांनी सांगितलेला शांतीचा मार्ग, शांततेचा संदेशच या देशास तारू शकेल असे मला वाटते…
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

