आसमा सय्यद, पुणे शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- पुण्यात गुन्हेगारी मोठया प्रमाणात वाढत आहे. त्यात कोयता गँगने तर शहरभर दहशत माजवली असल्याचे मागील अनेक घटनेवरून समोर येत आहे. त्यामुळे पुण्यामधील कोयता गँगकडे दुर्लक्ष करणाऱ्या, दोन पोलीस निरीक्षकांसह सात पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.
पुणे येथील तळजाई व सहकार नगर परिसरात वाहनांची तोडफोड होण्याच्या घटनांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून सहकारनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच पोलिस निरीक्षक आणि पाच कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी गुरुवारी निलंबित केले. या महिन्यात घडलेल्या वाहन तोडफोड घटनांची तक्रार गांभीर्याने न घेणे या पोलिस अधिकाऱ्यांना महागात पडले आहे.
सहकारनगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक (सध्या नेमणूक नियंत्रण कक्ष) सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक मनोज शेंडगे, सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी आणि मारुती वाघमारे, हवालदार संदीप पोटकुले, विनायक जांभळे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. कर्तव्य गांभीर्याने आणि जबाबदारीने पार पडले नसल्याने शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.
अरण्येश्वर भागात टोळक्याने दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री दहा ते पंधरा वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण केली होती. तोडफोड करणाऱ्या गुंडांनी घरांवर दगडफेक केल्याने घबराट उडाली होती. गेल्या आठवड्यात तळजाई पठार परिसरात सराईत गुंड आणि साथीदारांनी 26 वाहनांची तोडफोड केली होती. त्यामुळे नागरिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. या टोळक्याने सहकारनगर भागात भररस्त्यात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा केल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.दरम्यान, साळगावकर यांची पोलीस नियंत्रण कक्षात दोन दिवसांपूर्वी बदली करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच त्यांच्या निलंबनाचे आदेश आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. साळगावकर यांच्या विरोधात अनेक तक्रारी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या.

