रविंद्र भदर्गे, जालना उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जालना:- अपयशी ही यशाची पहिली पायरी आहे या उक्तीप्रमाणे स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना अपयश पचवण्याची तयारी ठेवावी लागते. कठोर परिश्रम घेतल्यास यश नक्कीच मिळते. UPSC अंतर्गत घेण्यात आलेल्या इंडियन फॉरेस्ट सर्विसेस परीक्षेत परतुर तालुक्यातील आनंदवाडी गावचा गौतम नारायण पडिभार याने 139 व्या क्रमांकावर येण्याचा मान मिळविला. निवृत्त शिक्षक सुंदर पडिभार यांचे ते पुतणे आहेत
लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आईने मोलमजुरी करून गौतम व इतर भावंडांना उच्च शिक्षण दिले तसेच काकांनी सदैव उच्च शिक्षणा साठी सहकार्य केले व दिशा दाखवून खंबीरपणे पाठीशी उभे राहिले. लहानपणापासूनच अतिशय मेहनती व हुशार असलेल्या गौतम याने देशातील नामांकित अशा IIT मद्रास येथून बीटेक इंजिनियर परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण करून आपले लक्ष यूपीएससी स्पर्धा परीक्षाकडे वळविले. स्पर्धा परीक्षा बरोबरच त्याने हॉलीबॉल, योगा, चित्रकला इत्यादी छंद ही जोपासले.
यूपीएससी परीक्षेतून करिअर करायचे निश्चित करून अहोरात्र तयारी केली त्याचेच फलित म्हणून या परीक्षेत निकाल 01जुलै 2023 शनिवार रोजी जाहीर झाला त्यात त्याने देशातून 139 वा क्रमांक पटकावून उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला. गौतम याचे प्राथमिक शिक्षण आनंदवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. इयत्ता पाचवी मध्ये शिकत असताना नवोदय विद्यालय परीक्षा उत्तीर्ण करून पुढील इयत्ता सहावी ते बारावी सायन्स पर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय आंबा येथे पूर्ण करून तेथे प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला यानंतर देशातील प्रतिष्ठित अशा आयआयटी मद्रास येथील बी टेक सिव्हील इंजिनिअरची पदवी त्याने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली.
आपल्या ज्ञानाचा व शिक्षणाचा उपयोग समाजाला समाजाला व्हावा यासाठी त्याने बीटेक नंतर यूपीएससी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली कुटुंबात कुठलाही प्रकारची प्रशासकीय पार्श्वभूमी नसताना एक ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी उचललेले हे मोठे पाऊल होते. त्यामुळे परीक्षेदरम्यान त्याला अनेक अडचणी व अपयशाला समोर जावे लागले परंतु अपयशातून खचून न जाता त्याने सातत्याने परिश्रम करून जिद्दीने व संयमाने अभ्यास करून प्रतिकूल परिस्थितीवर मात केली व देशात 139 वा क्रमांक पटकावला या यशासाठी त्याला आई, काका, काकू, भाऊ, वहिनी व परिवारातील सर्व सदस्यांनी मोलाची साथ दिली. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.