डॅनियल अँथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पिंपरी:- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या नवीन वाहनांचा लोकार्पण सोहळा आज शनिवार (ता.८) रोजी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते पार पडला. यामधील ०५ स्कॉर्पिओ आणि १२ बोलेरो अशा एकूण १७ नवीन शासकीय वाहनांना पालकमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या ताफ्यात समावेश करण्यात आला आहे.
याप्रसंगी खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेश दादा लांडगे, माजी खासदार अमर साबळे, यांच्यासह दिलीप मोहिते, आमदार उमा खापरे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चोबे, डॉ.संजय शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी व भाजपा पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील प्रशासकीय कामगाजाची पाहणी करताना पालकमंत्री चंद्रकांत दादा म्हणाले, की महिलांच्या सुरक्षेसाठी पिंपरी चिंचवड आयुक्ताल याच्या हद्दीत दामिनी पथकांची संख्या वाढवली पाहिजे. त्या करिता वाहने कमी पडू देणार नाही. सायबर क्राईम लॅबची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. याशिवाय आयुक्तालयात सुरू असलेला दिशा या उपक्रमात सहभागी असलेल्या ०७ अशासकीय संस्था प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांचा या उपक्रमामध्ये सहभाग वाढवावा. तसेच ज्येष्ठ नागरिक कक्षाच्या द्वारे ज्येष्ठांच्या समस्या वेळेस सोडवण्यासाठी प्रयत्न करावे.
नवीन वाहनांच्या समायोजनामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील बहुतांश भागात भेडसावणारा वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. शिवाय या वाहनांची गस्त घालण्यासाठी देखील मदत होणार आहे. पोलिसांच्या वसाहती, रिक्त पदे, जलद प्रतिसाद पथक, प्रलंबित प्रस्ताव व इतर मागण्या आणि समस्या याविषयी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊन प्रश्न निकाली काढले जातील असे आश्वासन देखील पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले आहे.