मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गडचिरोली:- जिल्हात स्वातंत्र दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असताना गडचिरोली जिल्हातून भारताच्या 76 व्या स्वातंत्रदिनी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील आरमाेरी तालुक्यातील काेरेगाव ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजाराेहण कार्यक्रमासाठी आलेले ग्रामसेवक ध्वजाराेहण न करताच ग्रामपंचायत कार्यलयात दारूच्या नशेत जमिनीवर लाेळत होता. यावेळी गावातील तरुणांनी त्याचे व्हिडीओ काढून साेशल मीडियावर व्हायरल केले आहेत. ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
आरमोरी पंचायत समितीं अंतर्गत येणाऱ्या कोरेगाव ग्रामपंचायतमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाची तयारी झाली. ग्रामपंचायतीमध्येच मुख्य ध्वजारोहण होत असल्याने गावातील नागरिक, ग्रामपंचायत पदाधिकारी, शालेय विद्यार्थी ध्वजारोहणासाठी एकत्र आले. सगळीकडे देशभक्ती आणि उत्साहाचे वातावरण होते. तेवढ्यात ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यू. एम. प्रधान आपल्या स्वगावावरून दुचाकीने ग्रामपंचायतीमध्ये पोहोचले. दुचाकीवरून उतरून सरळ ग्रामपंचायत कार्यालयातील आपल्या कक्षात गेले. हळूहळू ध्वजारोहणाची वेळ होऊ लागली तरी ग्रामसेवक आपल्या कक्षातून बाहेर येईना म्हणून नागरिकांनी जाऊन पाहतात तर काय ग्रामसेवक दारूच्या नशेत जमिनीवर लाेळले हाेते.
हे चित्र बघून उपस्थित नागरिकांचा संतापाचा पारा चढला त्यानंतर उपस्थित नागरिकांनी त्या ग्रामसेवकांचे मोबाइलवरून फोटो काढले. सोशल मीडियावर ते व्हायरल झाले. एक व्हिडीओ आरमोरी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे पाठवून झालेल्या प्रकाराची माहिती भ्रमणध्वनीद्वारे बीडीओला देण्यात आली. बीडीओ मोहरकर यांनी या प्रकाराबद्दल ग्रामसेवक प्रधान यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहेत.
कोरेगाव ग्राम पंचायत मध्ये ग्रामसेवक प्रधान यांची नियुक्ती झाल्यापासून ते नियमित हजर राहत नाही. आर्थिक व्यवहारातही मोठा गैरव्यवहार आहे. असे असताना देखील गावकऱ्यांनी त्यांना सांभाळून घेतले; पण स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दारूच्या नशेत राहून केलेली कृती अशोभनीय आहे. ग्रामसेवक प्रधान यांना तात्काळ निलंबित करावे. या मागणीसाठी पोलिस पाटील ओमप्रकाश मडावी, खुशाल बावणे, विश्वेशराव उसेंडी, दुर्गेश टेंभुर्णे हे जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहेत.