विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहमदनगर:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे – बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला. खळबळजनक बाब म्हणजे या दरोडेखोरांनी दरोडा टाकल्यानंतर एका व्यक्तीची ओढणीच्या मदतीने खून केला त्यानंतर आरोपींनी घरातील ऐवज घेऊन घटनास्थळावरुन पळून गेले आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली आहे.
काय आहे ही घटना?
श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे-बेलापूर रस्त्यावर मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हा सशस्त्र दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी घरात घुसून एका विवाहित व्यक्तीची ओढणीच्या मदतीने गळा आवळून हत्या केली आहे. नईम पठाण असे 33 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे.
मृतक नईम यांची पत्नी रात्रीच्या सुमारास लघुशंका करण्यासाठी घराबाहेर आली होती त्यावेळी दबा धरून बसलेल्या पाच दरोडेखोरांनी तिला फरफटत घरात आणून जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. आरडाओरडा होताच, दरोडेखोर घरात आल्याचे नईमच्या लक्षात आले. मात्र काही करायच्या आतच दरोडेखोरांनी नईमला घरातील लहान बाळांच्या झोक्यासाठी बांधलेल्या ओढणीने गळफास दिला आणि त्याची निर्घृणपणे खून केला.
यानंतर या दरोडेखोरांनी घटनास्थळावरून सात लाख रुपये आणि सोने – चांदी असा ऐवज चोरून नेला. धक्कादायक म्हणजे या आरोपी दरोडेखोरांमध्ये एका महिलाचा देखील समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत दरोड्याच्या तपास सुरू केला.