मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन आलापल्ली: ग्रामीण भागातील महिलांची शाश्वत उपजीविका वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान या प्रकल्पाच्या माध्यमातून शाश्वत शेती, पशूपालन, मत्स्यपालन, प्रक्रिया उद्योग याकरिता व्यक्तिगत व सामुहिक उपजीविका उपक्रमाच्या विकासातून उत्पन्न वाढीसाठी तांत्रिक मार्गदर्शन व अर्थसहाय्य करण्यात येते.त्या माध्यमातून महिलांनी उद्योगातून आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी केले.
उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती अहेरी अंतर्गत जननी महिला प्रभाग संघ आलापल्ली तर्फे ग्रामपंचायत भवण येथे संकल्प सप्ताह-समृद्धी दिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जननी महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष वंदना राजेश आत्राम,प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका व्यवस्थापक सतीश उमरे,ग्रा प सदस्य पुष्पा अलोने, माजी सरपंच सुगंधा मडावी,शकुंतला दुर्गम,प्रभाग समन्वयक शालिनी लोणारे,प्रतिमा गावतुरे ,प्रियांका गोंगले,गीता कविराजवार,लक्ष्मी रामटेके,राजश्री जनकर, लैजा बोरूले, अनुशा करपे आदी उपस्थित होते.
त्या पुढे बोलताना गावस्तरावर उपजीविकेचे विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी ग्रामसंघ व प्रभाग संघ, महिला शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून त्यांना अर्थसहाय्य व कृतीसंगमच्या माध्यमातून शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मार्गदर्शनातून संकलन केंद्र उभारणे, शेती अवजार बँक स्थापन करणे, महिला शेतकऱ्यांची शेती शाळा घेणे, विविध संस्थाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांकरिता तांत्रिक प्रशिक्षणासाठी नियोजन करणे असे विविध उपक्रम राबविले जातात. महिला बचत गट अधिकाधिक प्रगतीपथावर गेल्यास महिला सक्षम होईल. या माध्यमातून अन्य महिलांना देखील प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी केले.आयोजित कार्यक्रमाचे प्रस्ताविक सतीश उमरे,संचालन मनीषा जंबेवार तर आभार मनीषा दुर्गे यांनी मानले.
बचत गटांना धनादेश वाटप
बचत गटाच्या महिलांच्या उद्योगधंद्यात वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून ८ गटांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांचा धनादेश वितरण करण्यात आले. संकल्प सप्ताह निमित्ताने १७ महिलांचे वयक्तिक बँक खाते उघडण्यात आले.तसेच प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा,प्रधानमंत्री जीवन सुरक्षा विमा अंतर्गत १४८ महिलांचे विमा काढण्यात आले.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेची दिली माहिती
ग्राम संघांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देऊन त्यांना प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत त्यांना ५ टक्के व्याजदरात तीन लाख रुपये पर्यंत कर्ज देण्यात येते.त्यात पहिला हप्ता १लाख,दुसरा हप्ता २ लाख आणि तिसरा हप्ता ३ लाख अश्या प्रकारे काही प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना देण्यात येतो.या योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली.