🖊️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी मोबा. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व काही ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राखीव जागेवर निवडणूक लढवू ईच्छिणाऱ्या उमेदवारांच्या जात पडताळणी अर्जावर जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने स्वाक्षरीसाठी तहसिलदारांना प्राधिकृत करण्यात आले आहे. जानेवारी ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणूका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतींच्या सदस्य पदासह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी संगणक प्रणालीद्वारे तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील 29 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक तसेच 33 ग्रामपंचायतीमधील 46 सदस्य तसेच 2 सरपंच रिक्त पदांकरिता दिनांक 16 ते 20 ऑक्टोंबर या कालावधीत उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र मागविण्यात येणार आहे.महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनांक 28 एप्रिल 2023 मधील तरतुदीनुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम १०- १ क व ३०१ क तरतुदीनुसार राखीव प्रभागातून निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याबाबचा अर्ज जात पडताळणी समितीकडे सादर केल्याची पोच व हमीपत्र नामनिर्देशन पत्रासोबत दाखल करणे आवश्यक आहे.
त्यामुळे जात पडताळणीसाठी अर्ज घेऊन येणाऱ्या उमेदवारांच्या अर्जावर जिल्हाधिकारी यांच्यावतीने स्वाक्षरी करण्याकरीता संबंधित तालुक्याचे तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. उमेदवारांच्या जातपडताळणीकरीता असणाऱ्या अर्जावर, प्रस्तावावर तहसिलदार यांनी जिल्हाधिकारी यांच्यावतीने स्वाक्षरी करून उमेदवारास सदर प्रस्ताव जातपडताळणी समितीकडे सादर करण्याकरीता परत करावा. उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांनी जात पडताळणी समितीकडून मिळणारी पोचपावती स्वतः प्राप्त करून घेण्याबाबत सूचित करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.