उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- दिवाळीच्या दिवशी सांगली जिल्हा हादरला आहे. येथील शिराळा तालुक्यातील कापरी येथे पैशाच्या वादातून छोट्या भावाने आपल्याच मोठ्या भावाचा लाकडी दांडके डोक्यात घालून हत्या केल्याची घटना दिवाळीला दिनांक 12 नोव्हेंबर रोजी घडली आहे. महेश राजेंद्र मोरे वय 27 वर्ष याचा जागेवरच मृत्यू झाला असून, संशयित आरोपी अविनाश राजेंद्र मोरे वय 22 वर्ष हा फरार झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
शिराळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महेश मोरे व संशयित आरोपी अविनाश मोरे मुळ रा. हालोंडी ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर, सध्या रा. कापरी, ता. शिराळा हे आपल्या आईसह लहान पनापासून आजोळी मामा व आजीकडे कापरी ता. शिराळा येथे रहात होते. त्यांचे वडील गावाकडेच असतात. महेश याचे लग्न झाले असून त्याचा घटस्फोट झाला आहे. महेश व अविनाश दोघांमध्ये पैशांवरून वारंवार भांडणे होत होती. दोघे ही सेट्रिंगवर कामावर जात होते.
महेश कामाचे पैसे घरात देत नसल्याने घरात सतत वादावादी होत होती. रविवारी रात्री अविनाश याचे आई व भावाबरोबर भांडण झाले. घराच्या समोर असणाऱ्या रस्त्यावर दोघांची भांडणे सुरू झाली होती. यावेळी संशयित आरोपी अविनाश याने महेशच्या डोक्यात लाकडी दांडके घातले. यामध्ये महेश गंभीर जखमी झाला व खाली कोसळला. डोक्यात गंभीर माराहाण झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला व त्याचा जाग्यावरच मृत्यू झाला.
महेश याचे शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून कापरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. महेश याच्या मागे आई वडील असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत.