अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- सध्या मराठा आरक्षण मुद्दा मोठ्या प्रमाणात तापला आहे. त्यामुळे नेते आणि मराठा आंदोलन कर्त्यात जोरदार तू तू मैं मैं सुरू आहे. त्यात राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात झालेल्या ओबीसी बचाव एल्गार सभेवरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी त्यांच्यावर टीका केली. आरक्षणाच्या प्रश्नावरून दंगली घडवण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
अकोला येथील जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे वंचित बहुजन आघाडीकडून ओबीसी संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. प्रत्येक जिल्ह्यात ओबीसी संवाद मेळावे घेत आहोत. वेगवेगळ्या समाज घटकांना एकमेकांमध्ये झुंजवण्याचे काम सुरू असून, याची जाणीव करून देण्यात येत आहे.
आपण संविधानाच्या चौकटीत राहून ओबीसी- मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊ शकतो. मात्र दोन्ही समाजाला झुंजवण्याचे कारण काय, असा सवाल यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केला. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी गावातून आंदोलनाला प्रारंभ केला. याच जिल्ह्यातील अंबड येथे छगन भुजबळ यांनी आव्हान दिले. हे राजकारणातील आव्हान कशासाठी, असा सवाल करीत आपण एकमेकांचे वैरी नाहीत. त्यामुळे आरक्षणासह प्रत्येक प्रश्न घटनेच्या चौकटीत राहूनच सोडवता येतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हे करीत असताना कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही, याचीही काळजी घेता येते. मात्र या मुद्दावर अभ्यास न भाष्य करण्यात येत आहे. आरक्षणाचा मुद्दा कसा सोडवता येईल, यावर मी योग्य वेळी तपशीलासह बोलणार, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले. मनोज जरांगे यांचा बोलविता धनी कोण असा प्रश्न विचारणाऱ्या राज ठाकरे यांचा बोलविता धनी कोण, असा सवालही त्यांनी यावेळी केला.