सोलापूर जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सोलापूर:- सोलापूर पोलीस दलातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून व मानसिक खच्चीकरण झाल्याचे सांगून सोलापूर येथील जिल्हा कारागृहात एका पोलिस कर्मचाऱ्याने कारागृहाच्या प्रवेशद्वारावर स्वतःवरच गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर पोलीस दल हादरलं आहे. विकास गंगाराम कोळपे असे या पोलिसाचे नाव आहे
नेमके काय प्रकरण ?
विकास गंगाराम कोळपे यांना गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. सोलापूर शहरातील जिल्हा कारागृहात ते गार्ड म्हणून सेवेत आहेत. विकास कोलपे यांनी स्वत:वर गोळ्या झाडून घेण्यापूर्वी फेसबूकवर जन्म आणि मृत्यूची तारीख टाकून ‘भावपूर्ण श्रद्धांजली सिंघम’ अशी पोस्ट केली होती.तसेच त्यांनी या पोस्टमध्ये वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून मानसिक खच्चीकरण झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात युद्धपातळीवर उपचार सुरु आहेत.
विकास कोळपे यांच्याविषयी थोडक्यात माहिती
विकास कोलपे हे मूळचे पुणे जिल्ह्यातील देवाची आळंदी येथील रहिवासी आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची सोलापुरातील जिल्हा कारागृहात बदली झाली होती. त्यांनी यापूर्वी 2013 मध्ये कोल्हापूर, 2016 येरवडा कारागृह (पुणे), 2017 अहमदनगर, 2019 सांगली आणि 2021मध्ये सोलापूर जिल्हा कारागृहात मुख्य प्रवेशद्वारात गार्ड म्हणून कार्यरत होते. त्यांनी स्वतःजवळील एसएलआर बंदुकीतून स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला.