श्याम भुतडा, बीड जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बीड:- मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपत आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारी पासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा बीड येथे झालेल्या निर्णायक इशारा सभेत केली.
मराठा समाजाची सरकार फसवणूक करत आहे. सरकारला मराठा जात संपवायची आहे. आंदोलन शांततेत करायचं हेच आपलं ब्रम्हास्त्र आहे. मराठा आरक्षण आंदाेलन शांततेच्या मार्गानेच सुरु राहिल. जो हिंसा करेल तो आपला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले, मराठा बांधव कोणी शेतात, बाहेर गावी असताना घरी नोटीसा दिल्या. ट्रॅक्टर घेऊन जावू नको म्हणून नोटीसा दिल्या. मग मराठा म्हणाला. मी कुठेच नाही, नोटीसा दिल्या तर मग आता सगळ्यात पुढे मी असेन. कितीही नोटीसा देऊ द्या. आंदोलन करायचे परंतू शांततेत. शांततेच्या आंदोलनात खरी ताकत आहे. आपले शांततेचे आंदोलन कोणीच रोखू शकत नाही, असे सांगत सहन कधी पर्यंत करायचे. सुरूवातीला महिनाभराचा वेळ घेतला. आता 24 डिसेंबर तारीख सांगीतली. आणखी किती दिवस तारखा सांगणार? मराठ्यांनी कधीपर्यंत वाट पहायची? असे सांगत सभेतील उपस्थित मराठा बांधवांना तारीख ठरावायची का? असा सवाल जरांगे पाटील यांनी विचारला. गाफील राहु नका, मागं पुढे पाहून पाऊल टाका, काटे- कुटे पहा असे सांगत सरकारने 24 तारखेला मराठे मुंबईत येतील म्हणून 18 तारखेपर्यंत 144 कलम लागू केले. ठिक आहे, असू द्या 20 जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानावर मी अमरण उपोषणाला बसणार आहे. मला भेटायला मराठे येतील. त्यांना कसे आडवाल? असा सवाल करत मराठ्यांना कधीपर्यंत दाबून ठेवणार आहात? असा सवाल करत दिलेली 20 तारीख पटली का? तारीख बदलायची का? म्हणत उपस्थित लाखो मराठा बांधवांना जरांगे पाटील यांनी विचारणा केली. यावेळी लाखो मराठा बांधवांनी हात वर करत 20 तारखेच्या आंदोलनाला अनुमोदन दिले.
सरकारने मराठा आरक्षणप्रश्नी शहाणपणाची भूमिका घ्यावी, आमच्यावर डाव टाकू नये. आता आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही. आझाद मैदान, शिवाजी पार्क येथे आमरण उपोषण होणार आहे. फक्त मराठा समाजाला डाग लागला नाही पाहीजे, एवढी काळजी घ्यावी, मुंबईला जाण्याची जोरदार तयारी करा, असे आवाहनही या वेळी मनोज जरांगे पाटील यांनी केले.
जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणप्रश्नी नोव्हेंबरमध्ये सरकारला २४ डिसेंबर अल्टिमेटम दिला होता. सरकारने याबाबत अद्याप कोणताही निर्णय न घेतला नाही. यामुळे आज पुन्हा एकदा जरांगे-पाटील यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. आता मराठा आरक्षणप्रश्नी निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारकडे २० तारखेपर्यंत वेळ असेल, असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले. या जाहीर सभेला मराठा बांधवांचा लाखोंचा जनसागर लोटला होता.