नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नंदुरबार:- जिल्हातून पोलीस विभागाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सारंगखेडा येथे घोड्यांच्या बाजारामुळे आणि दत्त जयंतीनिमित्त सुरु झालेल्या यात्रोत्सवामुळे प्रसिध्द असलेल्या सारंगखेडा येथील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकासह पोलीस शिपायास 10 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक येथील पथकाने बेड्या ठोकल्या आहे. ही घटना समोर येताच संपूर्ण पोलीस विभागात एकच खळबळ माजली आहे.
सारंगखेडा यात्रेनिमित्त तक्रारदाराने दारु वाहतुकीचा व्यवसाय करण्यासाठी परवानगी मागितली असता सारंगखेडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील वय 44 वर्ष यांनी शनिवारी 21 हजार रुपयांची लाच मागितली. पण तक्रारदाराला लाच द्यायची नसल्यामुळे तक्रारदार याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. दरम्यान, तडजोडीअंती 10 हजार रुपयांची मागणी पाटीलने केली.
लाचेची रक्कम शनिवारी चालक, पोलीस शिपाई गणेश गावित वय 38 वर्ष याने पंचांसमक्ष लाच स्वीकारताच पथकाने त्यास आणि पोलीस निरीक्षक पाटील यांना रंगेहात ताब्यात घेतले. सापळा अधिकारी म्हणून निरीक्षक परशुराम कांबळे यांनी काम पाहिले. पथकात हवालदार सचिन गोसावी आणि प्रफुल्ल माळी यांचा समावेश होता.