प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मो . 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी हिंदी भाषेची सर्वाधिक सेवा केली. या भाषेच्या प्रचार प्रसारासाठी त्यांनी वर्धाच्या भूमितच राष्ट्रभाषा प्रचार समितीची स्थापना केली. हिंदी अतिशय प्रेमळ भाषा आहे. या भाषेचा प्रसार प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन पंजाबचे राज्यपाल तथा चंदीगडचे प्रशासक बनवारीलाल पुरोहीत यांनी केले.
राष्ट्रभाषा प्रचार समितीच्यावतीने समितीच्या परिसरात आयोजित 31 व्या अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार संमेलनाचे उद्घाटन राज्यपालांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष प्रो.डॅा.सूर्यकुमार दीक्षित होते. यावेळी खा.रामदास तडस, आ.डॅा.रामदास आंबटकर, वरिष्ठ पत्रकार तथा स्तंभलेखक विमल मिश्र, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलिस अधीक्षक नूरूल हसन, समितीचे कार्याध्यक्ष हेमचंद्र वैद्य उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी आगमण होण्यापूर्वी राज्यपालांनी प्रचार समिती परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
प्रचार समितीचा उद्देश केवळ हिंदी भाषा परीक्षा घेणे नसावा. हिंदी अतिशय समृद्ध भाषा आहे. हिंदी साहित्य खुप दर्जेदार आहे. या भाषेचा प्रचार करतांना हिंदी साहित्य देखील अभ्यासले गेले पाहिजे. देशाच्या दक्षिण भागात हिंदीचे प्रचलन नव्हते. राजगोपालाचारी यांनी दक्षिणेत हिंदी भाषा प्रचाराचे काम केले. जास्तीत जास्त जिल्ह्यात प्रचार समित्या स्थापन केल्या. मला देखील राज्यपाल या नात्याने तामिळनाडू येथे हिंदीची सेवा करण्याची संधी मिळाली, असे राज्यपाल पुढे बोलतांना म्हणाले.
देशाला विश्वगुरू बनविण्याचे ध्येय आपण बाळगले आहे. या ध्येयाला साध्य करण्यासाठी हिंदी भाषा माध्यम ठरणार आहे. प्रत्येकजन हिंदीप्रती प्रतिबद्ध असला पाहिजे. या प्रतिबद्धतेमुळेच प्रत्येक ठिकाणी हिंदीत भाषण करतो. हिंदी भाषेच्या प्रचारकांचे वर्तन साधे, स्वच्छ, निर्मळ असले पाहिजे, असेही ते म्हणाले. राज्यपालांनी यावेळी हिंदीतील काही कवितांच्या ओळीही ऐकविल्या.
वरिष्ठ पत्रकार विमल मिश्र यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. चीनी भाषेनंतर हिंदी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. हिंदी भाषिक राज्यांनंतर ही भाषा महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय आहे. देशातील पहिले हिंदी विश्वविद्यालय वर्धा येथे उभे राहिले. हिंदीच्या प्रचार प्रसारासाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान असल्याचे श्री.मिश्र म्हणाले. राष्ट्रभाषा प्रचार समितीचे कार्याध्यक्ष हेमचंद्र वैद्य यांनी प्रास्ताविकात भाषा हे अभिव्यक्ती, संप्रेषणाचे माध्यम आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी अन्य भाषा देखील शिकले पाहिजे, असे सांगितले.
यावेळी राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत यांच्याहस्ते संगिता गोटे, कीर्ति मिश्रा, डॅा.रत्ना चौधरी यांना सन्मानित करण्यात आले. राष्ट्रभाषा मासिक पत्रिकेचे प्रकाशन देखील राज्यपालांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे संचलन डॅा.अनुपमा गुप्ता यांनी केले. कार्यक्रमास हिंदी भाषिक साहित्यिक, विचारवंत, लेखक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपालांची पवनार आश्रमास भेट राज्यपाल बनवारीलाल पुरोहीत यांनी पवनार येथे आचार्य विनोबा भावे यांच्या आश्रमास भेट दिली. यावेळी त्यांनी विनोबांच्या समाधीचे दर्शन घेतले. आश्रमाची माहिती जाणून घेतली. पवनार आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम बजाज यांनी विनोबा भावेंचे कार्य व आश्रमाची माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक नूरूल हसन उपस्थित होते.