राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- कोरेगाव-भीमा येथील जयस्तंभ परिसरातून आम्हाला येथील जागेतून हद्दपार करु नये, अशी मागणी करत माळवदकर कुटुंबियांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. 1 जानेवारी 1818 मध्ये झालेल्या कोरेगाव-भीमा लढाईतील वीर जमादार खंडोजी माळवदकर यांच्या वंशजांनी मुंबई उच्च न्यायालयात नवी याचिका दाखल केली आहे.
सुभेदार कॅप्टन बाळासाहेब आनंदराव माळवदकर, नामदेव गुलाबराव माळवदकर, अशोक गुलाबराव माळवदकर यांनी ॲड. सुधन्वा बेडेकर यांच्या मार्फत ही याचिका दाखल करण्यात आलीये. या याचिकेवर 8 जानेवारी 2024 रोजी न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्यासमोर सुनावणी होणार आहे.
पिढ्यानपिढ्या या जयस्तंभाची देखभाल माळवदकर कुटुंबिय करत आहेत. कोरेगाव-भीमा लढाईनंतर ब्रिटीशांनी 13 डिसेंबर 1824 रोजी खंडोजी माळवदकर यांना या जयस्तंभाचे प्रभारी म्हणून नेमण्यात आलं होतं. 7 डिसेंबर 1841 रोजी शेजारील गावांमध्ये अधिकची जमीन देऊन त्यांना सनद दिली. पुढे साल 1849 मध्ये खंडोजी यांचे निधन झालं. स्तंभा शेजारील एकूण 3 हेक्टर 86 एकर भूखंडावर त्यांची शेती असून गेली 196 वर्षे या भूखंडाचा ताबा याच कुटुंबाकडे आहे. सध्या माळवदकर कुटुंबियांचा बंगला या जागेवर उभारण्यात आलाय. माळवदकर यांचे पूर्वज जमादार खंडोजी गजोजी माळवदकर हे ब्रिटीश लष्करात हवालदार होते. 1 जानेवारी 1818 मध्ये झालेल्या लढाईत ते जखमी झाले होते. या लढाईनंतर ब्रिटिशांनी त्यांच्यावरच या जयस्तंभाच्या देखभालीची जबाबदारी दिली.
हवेली येथील उपविभागीय अधिकारी यांनी 23 सप्टेंबर 2016 रोजी माळवदकर कुटुंबियांना नोटीस पाठवत या भूखंडावरील त्यांचं बांधकाम हटविण्याचे आदेश दिले. याविरोधात त्यांनी पुणे दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. मात्र पुणे दिवाणी न्यायालयानं माळवदकर कुटुंबियांचा या भूखंडावर दावा फेटाळून लावला. पुणे दिवाणी न्यायालयाचा हा निकाल रद्द करावा आणि या जागेतून आपल्याला हद्दपार करु नये, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली.