उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- जिल्हातील पातूर तालुक्यातून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. येथील आलेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गजानन डिवरे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यात प्रशासनात एकच खळबळ माजली आहे.
आलेगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक गजानन डिवरे यांच्या विरुद्ध पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी ग्रामसेवकाविरूध्द दोषारोप दाखल केले होते. यानुसार अकोला जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यपालन अधिकारी बी. वैष्णवी यांनी गजानन डिवरे यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.
सदर निलंबनाच्या कालावधीत ते मूर्तिजापूर पंचायत समितीमध्ये राहतील असे आदेशात नमूद आहे. ग्रामसेवक गजानन डिवरे यांच्यावर चौकशीस अभिलेखे उपलब्ध करून न देणे, १ ते ३३ नमूने अद्यावत न करणे, ग्रामपंचायतचा संपूर्ण प्रभार हस्तांतरित न करून देणे, स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत सांडपाणी आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापन न करून देणे, कर वसुली न करणे असा ठपका ठेवण्यात आला आहे.

