अभिजीत आर.सकपाळ, भिवंडी प्रतिनिधी
9960096076
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- वाहतुकीचे नियमन करताना अथवा, वाहनचालकांवर कारवाई करताना, बरेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, आपल्या गणवेशाच्या खिशात मोबाईल किंवा वॉकी-टॉकी ठेवून, जाणूनबुजून आपल्या नावाची पट्टी लपविण्याचा प्रयत्न करतात. परिणामी, एखाद्या नागरिकास पोलिसांविरोधात तक्रार करायची असल्यास, ती नावाअभावी करता येत नाही.
ही बाब ठाण्यातील समाजसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ता अजय जेया यांच्या लक्षात येताच, त्यांनी थेट ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांच्याकडे लेखी तक्रार करताच, याप्रकरणी दखल घेण्यात आलेली असून, अशापध्दतीने खिशात मोबाईल, वॉकी-टॉकी किंवा इतर कोणतीही सरकारी कागदपत्रे अथवा वस्तू ठेवून, गणवेशावरील आपल्या नावाची पट्टी (नेमप्लेट) झाकता येणार नसल्याचे तातडीचे आदेश देण्यात आले आहेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, यासंदर्भातील आदेश देण्यात आल्यानंतर, वाहतूक शाखेचे अधिकारी अचानकपणे कर्तव्यावर नेमलेल्या ठिकाणी भेटी देवून खात्री करणार असल्याचे, ठाणे वाहतूक शाखेच्या वतीने अजय जेया यांना पाठविलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मध्यंतरीच्या काळात नो-पार्किंगच्या नावाखाली झालेला टोविंग घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार उघड झाल्यानंतर, ठाणे शहरात एकच खळबळ उडाली होती. वाहनांवर कारवाई करताना ई-चालान न वापरणे, दुचाकी टोविंग केल्यानंतर, खासगी ठेकेदाराकडून दंडाची रक्कम वसूल करणे यासारखे बेकायदेशीर प्रकार बिनदिक्कतपणे घडत असल्याने, अजय जेया यांनी याप्रकरणी ठाण्यात आंदोलनाच्या माध्यमातून, वाहतूक शाखेचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडला होता.
याच पार्श्वभूमीवर, बरेच पोलीस अधिकारी आणि वाहतूक कर्मचारी आपल्या गणवेशावर नावाची पट्टी लपवून ठेवत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, अजय जेया यांनी याप्रकरणी पाठपुरावा करुन, यापुढे कोणत्याही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यास, आपल्या नावाची पट्टी झाकता येणार नाही, असे आदेश जारी करण्यात भाग पडले. याबाबत वाहनचालक व सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त करण्यात आले आहे.