उमेश इंगळे अकोला जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- अकोट तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत अनैतिक संबंधातून प्रियकराने आपल्या प्रेमीकेची धारधार चाकूने सपासप वार करून हत्या केली. त्यानंतर त्याने स्वतःचाही गळा कापल्याची घटना मंगळवार दिनांक 23 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, 23 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास अकोट तालुक्यातील लोहारी येथील प्रियकर अनिल श्रीकृष्ण तायडे वय 45 वर्ष हा व्यक्ती शोभना गजानन लांडे वय 36 वर्ष या महिलेच्या घरी आला. यावेळी त्याने सदर महिलेला शरीरसुखाची मागणी केली असता दोघांमध्ये वाद झाला. या वादात प्रियकराने या महिलेच्या गळ्यावर चाकूचे सपासप वार केल्यानंतर ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. एवढ्यावर तो थांबला नाही तर त्याने महिलेच्या पायावर व पोटावर चाकूचे असंख्य वार केल्यानंतर ती मृत झाल्याचे समजून त्याने स्वतःवर त्याच चाकूने वार करून स्वतःचा गळा कापून घेतला. यावेळी दोघांचा आरडाओरडा रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या लक्षात आला असता दार उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो दार उघडत नसल्याने दाराच्या मागील लोखंडी खिडकी तोडून आत प्रवेश करून दार उघडला असता, उपस्थितांना हा हत्येचा थरार पाहावयास मिळाला.
अनिल तायडे हा वर्षातून कित्येकदा शोभना हिला भेटासाठी माना येथे येत होता. दोघांचेही फोनवर अनेकदा बोलणे व्हायचे यामधून दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. या प्रेमसंबंधातूनच वाद विकोपाला जाऊन हत्या झाली असावी, अशी नागरिकांत चर्चा आहे. याबाबत माना पोलीस स्टेशनला माहिती मिळताच माना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूरज सुरवसे यांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने अकोला येथील फॉरेन्सिक टीमला बोलावून घेतले. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.