राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- लवकरच देशात लोकसभा आणि राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे त्यामुळे सर्व राजकीय पक्ष आपआपल्या परीने तयारीला लागले आहे. त्यात इंडिया आघाडी आणि भाजपा एनडिए मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई पक्षप्रवेश सोहळ्यात बोलत होते.
आगामी काळात लोकसभा आणि त्यानंतर चार महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामध्ये पक्ष-संघटना मजबूत करणे हे महत्त्वाचे आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पक्षप्रवेश झाला, तरी राज्यात त्यांच्या नेतृत्वात सगळ्यांनी काम केले पाहिजे. जोमाने काम केले, तर आपण आगामी काळात महाराष्ट्राचे चित्र बदलू शकतो,’ असा विश्वास शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत व्यक्त केला.
चिपळूण विधानसभा मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील प्रशांत यादव आणि भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग पाष्टे यांनी शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या वेळी पवार यांनी वरील विश्वास व्यक्त केला. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह पक्षातील इतर पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, ‘देशात सध्या सत्तेत असलेल्या पक्षाकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. केंद्रातील यंत्रणांच्या माध्यमातून पक्ष फोडाफोडीचे कामही करण्यात येत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. मात्र, सत्तेचा गैरवापर करून, सत्तेत असलेल्या सोबत आलेल्या व्यक्तींकडे शिवसेना देण्यात आली आहे. तसेच काहीसे आपल्यासोबत देखील झाले आहे.’
केंद्रात सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या वतीने केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून विरोधी पक्षाने स्थापन केलेल्या इंडिया आघाडीतील पक्षातील नेत्यांविरोधात विविध तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी केली आहे. आपल्या विरोधात दुसरा पर्याय उभा राहू नये याकरिता सत्तेचा गैरवापर करण्यात येत आहे, अशी टीका शरद पवार यांनी या वेळी केली.