अनिल अडकीने नागपुर सावनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- येथिल जवाहर कन्या विद्यालय व उच्च माध्यमिक महाविद्यालयात रस्ता सुरक्षा जागरूकता अभियान संपन्न झाले. रणजीत देशमुख डेंटल कॉलेज हिंगणा नागपूर आणि असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सिलो फेशियल सर्जन्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमानाने सर्जन दिवसाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थिनींना रस्ता सुरक्षा जागरूकता संदर्भात वाहन चालविताना आणि रस्त्यावरून चालताना सुरक्षतेचे नियम घ्यावयाची काळजी विविध चित्रफीत दाखवून तसेच शपथ घेऊन मार्गदर्शन देण्यात आले.
याप्रसंगी विद्या प्रसारक मंडळ सावनेर येथील संस्थापक सचिव स्वर्गीय दामोदररावजी डहाके साहेब यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यावेळी विद्या प्रसारक मंडळाचे सचिव नरेंद्रजी डाहाके, सभासद विनाताई बोबडे, यशपाल डाहाके, डॉ.राहुल डाहाके, स्वप्निल डाहाके, सोनाली जीवतोडे, जवाहर कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सीमाताई गोतमारे, पर्यवेक्षक राजू बांबल तसेच रणजीत देशमुख डेंटल कॉलेज हिंगणा नागपूर येथील डॉ.आदित हवेलीकर व डॉ.ऋषिकेश माळीकर आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी विद्या प्रसारक मंडळाचे सभासद तसेच मॅक्सलोफेशियल सर्जन डॉ. राहुल डाहाके यांनी तरुण पिढीला नशा करून रस्त्यावर वाहने चालवू नका असा इशारा दिला आणि त्यापासून होणाऱ्या अपघाताचे गंभीर परिणाम चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्याचा प्रयत्न केला.