अनिल अडकीने सावनेर नागपुर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- आज सर्वत्र सिमेंट रस्त्याचे जाळे विणल्या जात आहे. पण हेच रस्ते आज जीवघेणे ठरू पाहत आहे. त्यात रस्त्याला मोठ्या प्रमाणात भेगा पडून अपघात होण्याच्या घटना वाढल्या आहेत. खापा ते सावनेर मार्गावर अनेक ठिकाणी तडे गेले आहे. या मार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
सावनेर ते खापा या महामार्गावरील सिमेंट रस्त्याला अनेक ठिकाणी तडे जाऊन मोठमोठ्या भेगा पडल्या आहे. यामुळे या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. भेगा पडलेला रस्ता दुरुस्ती करण्याच्या नावाने गेल्या एक महिन्यापासून खोदून ठेवला आहे. एक महिना लोटला, परंतु अजूनही रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरूवात करण्यात आली नाही. याचा त्रास वाहनचालकास सहन करावा लागत आहे. वळण मार्गावरील हा रस्ता धोकादायक असून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम तत्काळ करण्यात यावे,अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
खापा-सावनेर महामार्गावरील कोदेगाव नजीकच्या गुरुजी पेट्रोल पंपाजवळ सिमेंट रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या होत्या. रस्ता दुरुस्ती करिता गेल्या एक महिन्यापासून खोदकाम करण्यात आले. मात्र, अद्याप रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले नाही.वळण रस्ता असल्याने अपघाताची शक्यताही बळावली आहे.एखादा अपघात झाल्यावर प्रशासनाला जाग येणार का?असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
या रस्त्याच्या दुरुस्ती करिता रस्ता खोदून ठेवण्यात आला आहे. हा भाग दोन वळणांमध्ये असल्याने या भागात अनेक अपघात होतात. त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. एचजी इन्फ्रा कंपनीने बांधकाम केलेल्या या मार्गाच्या दुरुस्तीची जबाबदारीही कंपनीची आहे. परंतु, एचजी इन्फ्रा कंपनीने दुरुस्तीचे काम अपूर्ण ठेवल्याने अनेकदा लोक अपघाताचे बळी ठरत आहेत.
मागील वर्षी याच महामार्गाच्या दुरुस्तीच्या वेळी एका दुचाकीस्वाराला १० चाकी ट्रकने चिरडले होते. अशा घटना परिसरात पुन्हा घडू नयेत, यासाठी गेल्या एक महिन्यापासून प्रलंबित असलेले रस्ता दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.