मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे. निवडणूक आयोगाचे पत्र पोस्ट करत शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर शरद पवार यांना नव्या पक्षाचे नाव मिळाले होते. आता नवीन पक्षाला निवडणूक चिन्हही मिळाले आहे. या संदर्भात शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाला ‘तुतारी’ हे निवडणूक चिन्ह देण्यात आले. निवडणूक आयोगाचे पत्र पोस्ट करत शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन याची माहिती देण्यात आली आहे. “एक तुतारी द्या मज आणुनि” या कवितेच्या काही ओळी यात लिहिण्यात आल्या आहेत.
“महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानठळ्या बसवल्या होत्या, तीच ‘तुतारी’ आज निवडणूक चिन्ह म्हणून निश्चित होणं ही ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’साठी गौरवास्पद बाब आहे. महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी, आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला हादरवून सोडण्यासाठी हीच ‘तुतारी’ पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे!” असे ट्विट शरद पवार गटाकडून करण्यात आले आहे.
शरद पवार गटाने निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या पक्षाचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह देशभरात प्रसिद्ध आहे. मात्र निवडणूक आयोगाने पक्ष आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आलेली असताना शरद पवार गटापुढे नवा पेच निर्माण झाला आहे. अशा स्थितीत आता सर्वोच्च न्यायालय नेमका काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला ‘नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार’ असे नाव दिलेले आहे. शरद पवार गटाने शरद पवार काँग्रेस, मी राष्ट्रवादी, शरद स्वाभिमानी अशा वेगवेगळ्या नावांचा तसेच चहाचा कप, सूर्यफूल आणि उगवता सूर्य अशा चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाला दिला होता.