प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- 8 मार्च हा जागतिक महिला दिन सर्व महिला भगिनींचा सन्मान व सत्कार करून जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी वर्धा अंतर्गत हिंगणघाट येथील अंगणवाडी ताईंचा सन्मान करण्याच्या दृष्टीने भीमाश्रम सभागृह येथे महिला दिनाचे मोठ्या उत्साहामध्ये आयोजन करण्यात आले.
हिंगणघाट अंतर्गत 54 अंगणवाडी मधील 108 अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याकरिता विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी ताई द्वारे नृत्य व गीत यांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ नयना तुळसकर, उप प्राचार्य विद्या विकास आर्ट, कॉमर्स, सायन्स कॉलेज समुद्रपूर यांनी महिलांच्या अंगी असलेल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची जाणीव करून देत प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले, कार्यक्रमाच्या विशेष अतिथी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्रणाली सायंकार यांनी स्त्रीचे आरोग्य सर्वात मोठी प्रॉपर्टी असून स्त्री स्वस्थ राहिली तर तिचं कुटुंब स्वस्थ राहील या अनुषंगाने आरोग्य संदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या संगीता पेठे गडवार, विषय साधन व्यक्ती, पंचायत समिती हिंगणघाट यांनी सामाजिक,आर्थिक, सबलीकरणांमध्ये स्त्रियांची भूमिका विशद करताना स्त्रीने स्वतःच्या सर्वांगीण विकासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. स्त्री पुरुष एकाच नाण्याच्या दोन बाजू अथवा एकाच रथाची दोन चाके असल्यामुळे स्वतःला कुठेही कमी न लेखता पुरुषाच्या बरोबरीने विकास प्रक्रियेमध्ये भर घातला पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकात्मिक बालविकास प्रकल्प वर्धा च्या मुख्य सेविका सौ मंजुषा क्षीरसागर यांनी केले. श्रीमती सिंधू फुलझेले यांनी सुमधुर स्वागत गीत गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले. विविध स्पर्धांमध्ये विजेता ठरलेल्या श्रीमती जया इंगोले, कल्पना गोडे, सोनू चौधरी, सातघरे यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महिला दिनाचा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला.